drmukteshdaund

घरातल्या कुणाला मदतीची गरज आहे? काय करावं, काय टाळावं

घरातल्या कुणाला मदतीची गरज आहे? काय करावं, काय टाळावं

आधी हे बघा

स्वतःला इजा करण्याबद्दल बोलत असतील, जगण्याची इच्छा नाही असं म्हणत असतील, जेवण-पाणी सोडलं असेल, किंवा वागणं अचानक पूर्णपणे बदललं असेल —

तर हे पान नंतर वाचा. आधी मदतीचं पान उघडा, किंवा टेली-मानसला फोन करा — १४४१६. तातडीचा धोका असेल तर ११२.

थोडक्यात

घरातल्या माणसाला मदतीची गरज आहे हे तुम्हाला दिसतंय, पण त्याला तसं वाटत नाही — ही सगळ्यात नेहमीची अडचण आहे.

यावर एका संभाषणात उत्तर मिळत नाही. पण काही गोष्टी नक्की मदत करतात: शांत वेळी बोलणं, आजाराचं नाव न घेता परिणामांबद्दल बोलणं, आणि नकार आला तरी दरवाजा उघडा ठेवणं.

आणि एक गोष्ट बहुतेकांना माहीत नसते — रुग्णाला न घेता तुम्ही स्वतः डॉक्टरांशी बोलू शकता.

मला दिसतंय, पण तो ऐकत नाही

हे वाक्य दवाखान्यात रोज ऐकू येतं. आणि ते बोलणारा माणूस बहुतेकदा थकलेला असतो.

कारण त्याने आधीच बरंच काही करून बघितलेलं असतं. समजावून सांगितलंय. रागावलंय. रडलंय. नातेवाइकांकडून सांगितलंय. काहीही उपयोग झालेला नसतो.

इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. मदत नाकारणं हा बहुतेकदा हट्ट नसतो.

नैराश्यात असलेल्या माणसाला “माझ्यावर काही उपाय नाही” असं खरोखर वाटत असतं — तो आजाराचाच भाग असतो. व्यसनात नकार हा आजाराचं लक्षण असतो. आणि गंभीर मानसिक आजारांत तर आपल्याला काही झालंय हे जाणवणंच बंद होऊ शकतं.

म्हणून “तो मुद्दाम करतोय” हा निष्कर्ष बहुतेक वेळा चुकीचा असतो. आणि तो काढला की पुढचं सगळं संभाषण बिघडतं.

बोलायचं कसं

वेळ आणि जागा आधी ठरवा

भांडण झाल्यावर लगेच नको. रात्री उशिरा नको. नशेत असताना तर मुळीच नको.

सकाळची शांत वेळ, दोघंच, दार लावून — एवढं जमलं तरी अर्धं काम होतं.

आणि एकच माणूस बोलू द्या. चार जण मिळून बसले की ते समजावणं राहत नाही, सुनावणी होते.

आजाराचं नाव घेऊ नका

“तुला डिप्रेशन आहे”, “तुला ट्रीटमेंटची गरज आहे” — या वाक्यांनी संभाषण तिथेच थांबतं. समोरचा माणूस लगेच बचावात्मक होतो, कारण त्याला लेबल लावलं जातंय असं वाटतं.

त्याऐवजी जे दिसतंय ते सांगा.

फरक बारीक वाटेल, पण तो मोठा आहे. पहिल्या रकान्यात निदान आहे. दुसऱ्यात निरीक्षण आहे. निदानाशी वाद घालता येतो, निरीक्षणाशी नाही.

बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त

बोलायला सुरुवात केल्यावर मध्ये तोडू नका. उत्तर तयार ठेवून ऐकू नका.

आणि “असं वाटायचं काहीच कारण नाही” हे वाक्य टाळा. हेतू चांगला असतो, पण त्याचा अर्थ “तुला जे वाटतंय ते चुकीचं आहे” असा पोहोचतो.

काय टाळावं

  • सगळ्यांसमोर विषय काढणं. लाज वाटली की माणूस विचार करत नाही, बचाव करतो.
  • तुलना करणं. “बघ, त्याच्यावर याहून मोठं संकट आलं होतं” — यातून फक्त अपराधीपणा वाढतो.
  • धमकी देणं. “असंच चालू राहिलं तर मी माहेरी जाईन” हे बोलून काही साधत नाही, आणि नंतर ते पाळावंही लागतं.
  • अपराधीपणा वापरणं. “आमचा काही विचार करतोस की नाही” — हे आजार वाढवतं, कमी करत नाही.
  • गुपित ठेवण्याचं वचन देणं. काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर त्या एकट्याने वागवायच्या नसतात.
  • स्वतःच निदान करणं. इंटरनेटवर वाचून “तुला हेच झालंय” असं ठरवू नका.
  • औषधांबद्दल स्वतःचे निर्णय घेणं. सुरू करणं, बदलणं, बंद करणं — यातलं काहीही घरच्यांनी ठरवायचं नसतं.

नकार आला तर — आणि तो बहुतेकदा येतो

पहिल्या वेळी बहुतेक जण नाही म्हणतात. हा शेवट नाही.

इथे बरीच कुटुंबं चूक करतात — एकदा नकार मिळाला की विषय कायमचा सोडून देतात, किंवा उलट, रोज तोच विषय काढून घर युद्धभूमी करून टाकतात.

दोन्ही चुकीचं. मधला मार्ग असा —

  • बोलणं एकदा झालं की काही आठवडे तो विषय काढू नका. पण दरवाजा उघडा असल्याचं एकदा सांगून ठेवा — “तुला कधी वाटलं तर सांग, मी सोबत येईन.”
  • दरम्यान नोंद ठेवा. काय बदललं, कधीपासून, किती वेळा. ही नोंद पुढे डॉक्टरांना खूप उपयोगी पडते, कारण रुग्ण स्वतः बरंच कमी करून सांगतो.
  • त्रास वाढला की पुन्हा विचारा. बहुतेकदा माणूस एका वाईट आठवड्यानंतर तयार होतो — तो क्षण ओळखा.
  • शारीरिक तक्रारीचा दरवाजा वापरा. “मानसोपचारतज्ज्ञाकडे चल” ऐकायला जड जातं; “झोपेसाठी एकदा दाखवून घे” किंवा “पोटाच्या त्रासासाठी तपासून घे” सोपं जातं. आणि ती तपासणी उपयोगीही असते — काही मानसिक लक्षणांमागे शारीरिक कारणं असतात.

आणि सगळ्यात महत्त्वाचं — दरम्यानच्या काळात नातं तोडू नका. जो माणूस पुढे मदत घेईल, तो ती याच नात्याच्या आधारावर घेईल.

तुम्ही एकटे डॉक्टरांकडे जाऊ शकता

हे बहुतेकांना माहीत नसतं, म्हणून ठळकपणे सांगतो.

रुग्णाला घेऊन येणं दर वेळी आवश्यक नाही. घरातले लोक स्वतंत्रपणे मानसोपचारतज्ज्ञाशी बोलू शकतात.

अशा भेटीत काय होतं —

  • तुम्ही जे बघताय ते खरंच काळजीचं आहे का, हे समजतं
  • तातडीचं काही आहे का, हे ठरवता येतं
  • कसं बोलावं, कधी बोलावं याबद्दल ठोस सल्ला मिळतो
  • पुढच्या पायऱ्या काय, हे कळतं

रुग्णाच्या अनुपस्थितीत निदान होत नाही, आणि औषधंही दिली जात नाहीत — ते होऊही नये. पण दिशा मिळते, आणि महिनोन्महिने अंधारात चाचपडणं थांबतं.

टेली-मानस (१४४१६) वरही घरच्यांना बोलता येतं. रुग्णानेच फोन करावा असा नियम नाही.

कायदा हा जबरदस्तीचं साधन नाही

हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे, कारण या टप्प्यावर बरीच कुटुंबं तोच विचार करतात.

मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ हा मुख्यतः रुग्णाच्या संरक्षणासाठी आहे — कुटुंबाच्या हातातलं साधन म्हणून नाही.

दाखल होणं हे मुळात स्वतःच्या संमतीने असतं. “त्याला उचलून नेऊन भरती करा” असं करता येत नाही, आणि तसं करून देणारी कुठलीही खासगी सेवा बेकायदेशीर काम करत असते.

स्वतःची काळजी घेण्याइतपत स्थिती नसलेल्या रुग्णासाठी कायद्यात वेगळी तरतूद आहे. पण तिला डॉक्टरांची तपासणी, ठरावीक कारणं, मुदत आणि नोंद लागते. ती सोय आहे, पळवाट नाही.

आणि व्यवहारात एक गोष्ट लक्षात ठेवा — जबरदस्तीने आणलेला माणूस उपचारात टिकत नाही. सोबत आणलेल्या विश्वासाची जागा कुठलाही कायदा घेऊ शकत नाही.

एक प्रसंग

(हा अनेक अनुभवांवरून तयार केलेला काल्पनिक प्रसंग आहे. कुठल्याही एका व्यक्तीचा नाही.)

एका मुलीला वडिलांबद्दल काळजी वाटत होती. निवृत्तीनंतर ते हळूहळू गप्प झाले होते. बाहेर पडेनासे झाले. पूर्वी रोज फिरायला जाणारे आता दिवसभर बसून राहायचे.

तिने चार वेळा विषय काढला. चारही वेळा उत्तर एकच — “मला काही झालेलं नाही. उगाच काहीतरी.”

पाचव्या वेळी तिने वेगळं केलं. डॉक्टरकडे जाण्याचा विषयच काढला नाही.

म्हणाली, “बाबा, तुमचं वजन कमी झालंय आणि झोप नीट होत नाहीये. एकदा नेहमीची तपासणी करून घेऊ या. मी येते सोबत.”

ते तयार झाले.

तपासणीत शारीरिक फार काही निघालं नाही. पण त्या डॉक्टरांनीच पुढे पाठवलं. उपचार सुरू झाले.

नंतर ती म्हणाली — “मी आधीच्या चार वेळा त्यांना पटवायचा प्रयत्न करत होते. पाचव्या वेळी फक्त सोबत जायचं ठरवलं.”

घर चालू ठेवा

एक गोष्ट थोडक्यात, पण महत्त्वाची.

घरातल्या एका माणसाच्या आजारपणात संपूर्ण घर त्याभोवती फिरायला लागतं. आणि जो सगळ्यात जास्त काळजी घेतो — बहुतेकदा आई किंवा बायको — त्याला कुणीच विचारत नाही.

तुमची झोप, जेवण आणि तुमची स्वतःची कामं चालू ठेवा. हा स्वार्थ नाही. दमलेला माणूस फार दिवस कुणाची काळजी घेऊ शकत नाही.

यावर स्वतंत्र लेख लिहितोय, कारण या विषयाला एक परिच्छेद पुरेसा नाही.

प्रश्न आणि उत्तरं

त्याला न सांगता डॉक्टरांशी बोललं तर विश्वासघात होईल का?

नाही. तुम्ही स्वतःच्या काळजीबद्दल सल्ला घेताय. हवं तर नंतर सांगता येतं — “मी डॉक्टरांशी बोलले, कारण मला काळजी वाटत होती” हे प्रामाणिक आणि पुरेसं आहे.

औषधं जेवणात मिसळून द्यावीत का?

नाही. हे करू नका. ते चुकीचं तर आहेच, पण धोकादायकही आहे — मात्रा, परिणाम आणि इतर औषधांशी होणारा संबंध यावर कुणाचंच नियंत्रण राहत नाही. आणि हे कळल्यावर उरलेला विश्वासही संपतो.

नातेवाइकांना सांगावं का?

गरजेपुरतंच. ज्यांची प्रत्यक्ष मदत होणार आहे त्यांना सांगा. “सगळ्यांना कळू दे, म्हणजे तो सुधारेल” हा विचार उलटा परिणाम करतो.

किती दिवस वाट बघावी?

त्रास काही आठवडे टिकून असेल आणि रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर वाट बघू नका. आणि स्वतःला इजा करण्याबद्दल काही बोललं गेलं असेल, तर अजिबात वाट बघू नका.

आधार

  • मानसिक आरोग्य सेवा कायदा, २०१७
  • टेली-मानस — राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

सूचना

हे पान माहितीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही आणि प्रत्यक्ष तपासणीची जागा तो घेऊ शकत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला त्रास होत असेल तर पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तातडीच्या परिस्थितीत १४४१६ किंवा ११२ वर फोन करा.

Scroll to Top