डॉ. मुक्तेश दौंड — मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक
डॉ. मुक्तेश दौंड
मी काय करतो
मी मानसोपचारतज्ज्ञ आहे. नाशिकमध्ये २०१६ पासून काम करतो.
माझं काम प्रामुख्याने दोन भागांत विभागलेलं आहे. एक — व्यसनमुक्ती. दारू, तंबाखू, गुटखा आणि इतर अमली पदार्थ. दुसरं — नैराश्य, चिंता, झोपेचे त्रास आणि गंभीर मानसिक आजार.
दोन्ही एकाच खोलीत येतात, हे मला सुरुवातीलाच लक्षात आलं. दारू सोडायला आलेल्या माणसाला बहुतेकदा आधी नैराश्य आलेलं असतं. आणि नैराश्यासाठी आलेल्या माणसाच्या घरात बहुतेकदा दारूचा प्रश्न असतो.
हे मराठीत का लिहितो?
खोलीत बसून मी जे सांगतो, ते चाळीस मिनिटांत संपतं. घरी पोहोचेपर्यंत त्यातलं निम्मं विसरलेलं असतं.
मग माणूस शोधायला लागतो. गुगलवर, यूट्यूबवर, व्हॉट्सॲप वर विचारून.
मराठीत काय सापडतं? बहुतेक कुठल्यातरी केंद्राची जाहिरात. नाहीतर इंग्रजीचं यांत्रिक भाषांतर, ज्यात नेमकं मर्मच हरवलेलं असतं.
हे मला बरीच वर्षं खटकत आलंय. एका टप्प्यावर वाटलं — तक्रार करत बसण्यापेक्षा लिहायला सुरुवात करावी. म्हणून सृजन.
इथले लेख इंग्रजीतून भाषांतरित केलेले नाहीत. ते मराठीत लिहिलेले आहेत, आणि तसेच लिहीत राहणार आहे.
MBBS
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
DNB (मानसोपचार)
लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई प्रादेशिक मानसिक आरोग्य संस्था (LGBRIMH), तेजपूर, आसाम
तेजपूरबद्दल थोडं
मानसोपचाराचं शिक्षण मी आसाममध्ये घेतलं. तेजपूरची ही संस्था केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत चालणारी स्वायत्त संस्था आहे — देशातल्या मोजक्या मोठ्या मानसिक आरोग्य संस्थांपैकी एक.
महाराष्ट्रापासून दोन हजार किलोमीटर दूर, वेगळी भाषा, वेगळं जेवण. पण तिथे एक गोष्ट स्पष्ट कळली — मानसिक आजाराची लक्षणं भाषा बदलली तरी बदलत नाहीत. बदलतं ते कुटुंब त्याकडे कसं बघतं, आणि मदत मागायला किती वेळ लावतं
सध्या
- संचालक व सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ — NIMS मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
- लाइफ फेलो — इंडियन सायकियाट्रिक सोसायटी
- आजीव सदस्य — इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक
याशिवाय
बॅडमिंटन खेळतो. नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनशी संबंधित आहे.
रुग्णांना व्यायामाचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरने स्वतः कोर्टवर उतरावं, एवढाच त्यामागचा विचार आहे
नोंदणी व संदर्भासाठी
डॉ. मुक्तेश दौंड, MBBS, DNB (मानसोपचार). सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ व व्यसनमुक्ती तज्ज्ञ, नाशिक. फेब्रुवारी २०१६ पासून कार्यरत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी क्रमांक 2009/02/0243.
दवाखान्याचा पत्ता
NIMS मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सरस्वती हाइट्स, बँक ऑफ महाराष्ट्रसमोर, ठत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२००५ दूरध्वनी: +91 98540 19455 वेळ ठरवून येणं सोयीचं ठरतं.
सूचना
या संकेतस्थळावरील लेख माहितीसाठी आहेत. तो वैद्यकीय सल्ला नाही आणि प्रत्यक्ष तपासणीची जागा घेऊ शकत नाही. तातडीच्या परिस्थितीत १४४१६ किंवा ११२ वर फोन करा.