drmukteshdaund

dakhal-karave-lagle-tar

दाखल करावं लागलं तर काय होतं?

दाखल करावं लागलं तर काय होतं?

थोडक्यात

मानसिक आजारासाठी दाखल होणं म्हणजे बहुतेकदा काही दिवस ते काही आठवडे. महिनोन्महिने नाही.

बहुतेक रुग्णांना दाखल व्हावंच लागत नाही. जेव्हा लागतं, तेव्हा त्याचं कारण ठरलेलं असतं — तपासणीची गरज, तीव्र लक्षणं, सुरक्षिततेचा प्रश्न, किंवा घरी देखरेख शक्य नसणं.

आणि सगळ्यात महत्त्वाचं — दाखल होणं हा उपचाराचा शेवट नाही, सुरुवात आहे. खरं काम डिस्चार्जनंतर सुरू होतं.

डोक्यातलं चित्र आधी बाजूला ठेवू

“दाखल करावं लागेल” हे ऐकल्यावर बहुतेक कुटुंबांच्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं.

मोठी जुनी इमारत. गजांच्या खिडक्या. साखळदंड. आत गेलेला माणूस पुन्हा बाहेर येत नाही.

हे चित्र सिनेमातून आणि जुन्या काळातल्या ऐकीव गोष्टींतून आलेलं आहे. आणि त्यात तथ्य होतं — फार पूर्वी अशा जागा होत्या.

आजची परिस्थिती वेगळी आहे. कायद्याने साखळदंडाने बांधून ठेवणं पूर्णपणे बंद केलं आहे, एकांतवासात डांबणं बंद आहे, आणि तीस दिवसांपुढे चालणाऱ्या प्रत्येक दाखलाचं पुनर्विलोकन मंडळाकडून होणं अपेक्षित आहे.

आणि व्यवहारात — आजकालचे बहुतेक दाखल हे सामान्य रुग्णालयातल्या वॉर्डमध्ये, काही दिवसांसाठी होतात.

रुग्णाच्या हक्कांविषयी सविस्तर स्वतंत्र लेख दिलेला आहे.

दाखल कधी करावं लागतं

नेहमीच्या OPD उपचारांनी काम होत नसेल किंवा परिस्थिती तीव्र असेल, तेव्हा.

  • स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा होण्याचा प्रत्यक्ष धोका
  • जेवण-पाणी पूर्णपणे बंद होणं, शरीर खंगत जाणं
  • लक्षणं इतकी तीव्र की घरी सांभाळणं शक्य नाही
  • सोडताना गंभीर त्रासाची शक्यता असलेली व्यसनमुक्ती
  • नेमकं काय होतंय हे बाहेरून ठरत नसेल आणि जवळून निरीक्षण गरजेचं असेल
  • घरी देखरेखीसाठी कुणीच नसणं

हा निर्णय तपासणीनंतर डॉक्टर घेतात, आणि तो रुग्णाशी बोलून घेतला जातो. “तो ऐकत नाही” किंवा “घरात त्रास देतो” ही कारणं यात येत नाहीत.

कुठे दाखल करता येतं

पर्याय वाटतात त्यापेक्षा जास्त आहेत.

  • जिल्हा रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभाग
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे मानसोपचार विभाग
  • महाराष्ट्रातील प्रादेशिक मानसिक रुग्णालयं — ठाणे, पुणे (येरवडा), नागपूर आणि रत्नागिरी
  • नोंदणीकृत खासगी रुग्णालयं

शासकीय ठिकाणी उपचार मोफत किंवा अत्यल्प खर्चात होतात.

कुठलंही ठिकाण निवडताना नोंदणी तपासा — ती कायद्याने बंधनकारक आहे. यावर स्वतंत्र लेख दिलेला आहे.

आत काय असतं

प्रत्यक्ष वॉर्ड कसा असतो, हे कुणी सांगत नाही. म्हणून सांगतो.

बहुतेक ठिकाणी तो इतर वॉर्डसारखाच असतो. खाटा, कपाटं, पंखे, खिडक्या. नर्सिंग स्टेशन. डॉक्टरांची फेरी.

फरक एवढाच की देखरेख जास्त असते. कर्मचारी जास्त वेळा येऊन बघतात, आणि इजा होऊ शकेल अशा वस्तूंवर मर्यादा असतात.

बहुतेक रुग्ण आपापल्या खाटेवर असतात, फिरतात, बोलतात, जेवतात. कुणी बांधलेलं नसतं.

शारीरिक बंधनं ही अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, कमीत कमी प्रमाणात आणि नोंद ठेवून वापरली जातात — कायद्याने तशीच मर्यादा घातलेली आहे.

काय घेऊन जावं

  • आधीच्या सगळ्या तपासण्यांचे कागद आणि जुनी औषधं
  • ओळखपत्र आणि विम्याची कागदपत्रं
  • दोन-तीन दिवसांचे कपडे, चप्पल
  • नेहमीची इतर आजारांची औषधं — मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड
  • चष्मा, दात असतील तर कवळी

आणि काही गोष्टी सुरुवातीला ठेवून घेतल्या जातात — दोऱ्या, बेल्ट, धारदार वस्तू, कधी मोबाइलही.

हे शिक्षा म्हणून नाही. सुरुवातीचे काही दिवस सगळ्यात नाजूक असतात, आणि ही खबरदारी सगळ्यांसाठी सारखीच असते. काही दिवसांनी बहुतेक गोष्टी परत मिळतात.

दिवस कसा जातो

सकाळी डॉक्टरांची फेरी. औषधं ठरलेल्या वेळी. जेवण ठरलेल्या वेळी.

मधल्या वेळात तपासण्या, आणि गरजेनुसार समुपदेशन. काही ठिकाणी गटचर्चा किंवा उपक्रम असतात.

पहिले दोन-तीन दिवस बहुतेकांना कठीण जातात — नवी जागा, झोप बिघडलेली, आणि घरी जायची ओढ. हे अपेक्षित असतं.

आणि एक गोष्ट कुटुंबाने लक्षात ठेवावी: सुरुवातीला फरक दिसत नाही. औषधांना वेळ लागतो. पहिल्या तीन दिवसांत काही बदललं नाही म्हणून उपचार चुकीचे आहेत, असं नाही.

भेटायला येण्याबद्दल

प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे असतात, पण साधारण चित्र असं —

सुरुवातीचे काही दिवस भेटींवर मर्यादा असू शकतात. याचं कारण लपवाछपवी नाही — रुग्ण स्थिरावण्यासाठी शांतता लागते, आणि सुरुवातीच्या भेटी बऱ्याचदा “मला इथून घेऊन चल” या एकाच विषयावर जातात.

पण संपूर्ण बंदी हा इशारा आहे. कुठे, कधी आणि किती वेळ भेटता येईल हे दाखल करण्यापूर्वीच विचारून घ्या, आणि उत्तर स्पष्ट नसेल तर विचार करा.

भेटायला गेल्यावर काय करावं — शांत राहा, घरची चांगली बातमी सांगा, आणि “अजून किती दिवस” या विषयावर वाद घालू नका. तो प्रश्न डॉक्टरांना विचारा, रुग्णाशी चर्चा करू नका.

किती दिवस

परिस्थितीनुसार बदलतं, पण बहुतेकदा हे काही दिवस ते काही आठवडे असतं.

व्यसनमुक्तीसाठी सोडतानाची वैद्यकीय काळजी साधारण आठवडाभराची असते. इतर आजारांत लक्षणं आवरेपर्यंत.

आधीच ठरलेला ठरावीक कालावधी — “तीन महिन्यांचं पॅकेज” — हा उपचाराच्या गरजेवरून ठरलेला नसतो.

आणि कायद्याने तीस दिवसांपुढे चालणाऱ्या दाखलांचं पुनर्विलोकन होणं अपेक्षित आहे.

खर्च

शासकीय ठिकाणी मोफत किंवा अत्यल्प. खासगी ठिकाणी वेगवेगळा.

मानसिक आजारांवरील उपचारांना विमा संरक्षण देणं कायद्याने बंधनकारक आहे, पण तपशील पॉलिसीनुसार बदलतात. दाखल करण्यापूर्वी विमा कंपनीकडे लेखी विचारा — नंतर विचारल्यावर उत्तर बदलू शकतं.

आणि खर्चाचा अंदाज लेखी मागा. “बघू किती होतो” हे उत्तर पुरेसं नाही

डिस्चार्जच्या आधी हे सहा प्रश्न विचारा

१. नेमकं निदान काय आहे, आणि पुढे काय अपेक्षित आहे?
२. कोणती औषधं, किती दिवस, आणि कशासाठी?  
३. कोणते त्रास झाले तर लगेच फोन करायचा?
४. पुढची भेट कधी, आणि कुणाकडे?  
५. घरी काय काळजी घ्यायची — झोप, जेवण, कामावर परत जाणं?  
६. रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी अडचण आली तर कुणाला फोन करायचा?
ही उत्तरं लिहून घ्या. आणि शक्य असल्यास लेखी डिस्चार्ज कार्ड मागा

हा भाग बहुतेक कुटुंबांकडून सुटतो. डिस्चार्जच्या दिवशी सगळे घाईत असतात, आनंदात असतात, आणि निघून जातात. मग आठवड्याभरात प्रश्न सुरू होतात आणि उत्तर कुणाकडेच नसतं.

घरी आल्यावरचे पहिले दोन आठवडे

हा काळ सगळ्यात महत्त्वाचा असतो, आणि सगळ्यात कमी लक्ष दिला जातो.

  • औषधं वेळेवर. बरं वाटायला लागलं म्हणून बंद करण्याचा मोह याच काळात होतो.
  • झोपेच्या वेळा नियमित ठेवा.
  • लगेच सगळं पूर्ववत करण्याची घाई नको. कामावर कधी परत जायचं हे डॉक्टरांना विचारून ठरवा.
  • पहिली फॉलो-अप भेट चुकवू नका — बरं वाटत असेल तरीही. उलट, बरं वाटत असेल तेव्हाच ती जास्त उपयोगी असते.
  • घरात प्रश्नांचा भडिमार नको. “आता कसं वाटतंय” हे दिवसातून वीस वेळा विचारलं जातं आणि ते थकवणारं असतं.
  • आणि नातेवाइकांना काय सांगायचं हे रुग्णाला ठरवू द्या. ती त्याची माहिती आहे.

पुन्हा दाखल करावं लागलं तर

हे घडतं. आणि ते अपयश नाही.

काही आजारांत चढउतार असतात. पुन्हा दाखल होणं म्हणजे मागचे उपचार वाया गेले असा अर्थ नाही — बहुतेकदा त्याचा अर्थ एवढाच की परिस्थिती बदलली आहे आणि पुन्हा जवळून बघावं लागतंय.

आणि एक गोष्ट अनुभवाने सांगतो — ज्या कुटुंबांनी पहिल्या वेळी नीट फॉलो-अप ठेवलं, त्यांना दुसऱ्या वेळी लवकर लक्षात येतं आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मदत मिळते.

एक प्रसंग

(हा अनेक अनुभवांवरून तयार केलेला काल्पनिक प्रसंग आहे. कुठल्याही एका व्यक्तीचा नाही.)

एका कुटुंबाला डॉक्टरांनी सांगितलं की काही दिवस दाखल राहावं लागेल.

घरातल्या मोठ्या भावाचं पहिलं वाक्य होतं — “नको डॉक्टर. एकदा तिथे घातलं की माणूस परत येत नाही.”

डॉक्टरांनी विचारलं, “तुम्ही कधी असा वॉर्ड बघितलाय का?”

त्यांनी नाही म्हटलं.

मग डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्याआधी वॉर्ड बघून यायला सांगितलं.

ते गेले. परत आले आणि म्हणाले, “मला वाटलं होतं तसं काहीच नाहीये.”

अकरा दिवसांनी डिस्चार्ज झाला.

नंतर तो भाऊ म्हणाला — “आम्ही दोन वर्षं थांबलो होतो. आणि थांबण्याचं कारण एवढंच होतं की आत काय असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं.”

प्रश्न आणि उत्तरं

सोबत कुणी राहू शकतं का?

ठिकाणानुसार बदलतं. काही ठिकाणी नातेवाइकाला थांबता येतं, काही ठिकाणी नाही. दाखल करण्यापूर्वी विचारून घ्या.

नोकरीवर कळेल का?

वैद्यकीय माहिती गोपनीय असते. रजेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागलं तर त्यावर काय लिहावं याबद्दल डॉक्टरांशी आधीच बोला.

त्याला परत जायचं असेल तर?

स्वतःच्या संमतीने दाखल झालेला रुग्ण मागणी केल्यास डिस्चार्ज मागू शकतो. यावर कायद्यात नेमक्या तरतुदी आहेत आणि त्याविषयी स्वतंत्र लेख दिलेला आहे.

मुलांना भेटायला न्यावं का?

बऱ्याचदा हो, आणि ते दोघांसाठीही चांगलं असतं. पण आधी डॉक्टरांना विचारा, आणि मुलाला काय दिसेल याची कल्पना आधी द्या.

डिस्चार्जनंतर लगेच कामावर जाता येईल का?

घाई करू नका. कधी आणि किती हळूहळू, हे डॉक्टरांशी ठरवा. एकदम पूर्ण भार घेतल्याने पुन्हा त्रास होण्याची शक्यता वाढते.

आधार

  • मानसिक आरोग्य सेवा कायदा, २०१७ — दाखल, उपचार आणि डिस्चार्जसंबंधीच्या तरतुदी
  • महाराष्ट्र शासन — प्रादेशिक मानसिक रुग्णालयं, ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी

सूचना

हे पान माहितीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही आणि प्रत्यक्ष तपासणीची जागा तो घेऊ शकत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला त्रास होत असेल तर पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तातडीच्या परिस्थितीत १४४१६ किंवा ११२ वर फोन करा.

Scroll to Top