drmukteshdaund

काळजी घेणाऱ्यांची काळजी — घरातल्या माणसासाठी

काळजी घेणाऱ्यांची काळजी — घरातल्या माणसासाठी

हे पान तुमच्यासाठी आहे

घरात कुणी आजारी असेल, तर सगळे त्याच्याबद्दल विचारतात.

“आता कसा आहे? औषधं चालू आहेत ना? काय म्हणाले डॉक्टर?”

तुम्हाला कुणी विचारत नाही.

आणि दवाखान्यातही तसंच होतं. तुम्ही सोबत येता, माहिती सांगता, औषधांच्या वेळा लक्षात ठेवता, पुढची तारीख नोंदवता — आणि मग बाहेर थांबता.

तर हे पान तुमच्याबद्दल आहे. आजारी माणसाबद्दल नाही.

थोडक्यात

दीर्घकाळ कुणाची काळजी घेणं हे थकवणारं असतं. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही — तो ताण खरा असतो आणि तो मोजता येतो.

राग येणं, कंटाळा येणं, कधीकधी वाईट विचार येणं — हे बहुतेकांना होतं. त्याने तुम्ही वाईट माणूस ठरत नाही.

आणि तुम्ही दमलात तर काळजी घेणंही थांबतं. म्हणून स्वतःकडे बघणं हा स्वार्थ नाही, तो त्या कामाचाच भाग आहे.

जे मनात येतं, पण बोललं जात नाही

आता खरं बोलू. हे कुणी लिहित नाही, म्हणून लिहितो.

वर्षानुवर्षं कुणाची काळजी घेणाऱ्या माणसाच्या मनात हे येतं —

  • राग. त्या आजारी माणसावरच. “याच्यामुळे माझं आयुष्य असं झालं.”
  • कंटाळा. आज पुन्हा तेच, उद्याही तेच.
  • हेवा. दुसऱ्यांची घरं साधी, सरळ चाललेली दिसतात.
  • सुटकेची भावना. तो दाखल झाला की काही दिवस शांतता मिळते — आणि ते जाणवल्यावर लाज वाटते.
  • आणि कधीतरी, फार वाईट वाटणारा विचार — “हे कधी संपणार?”

यातलं काही तुमच्या मनात आलं असेल, तर तुम्ही एकटे नाही. आणि तुम्ही वाईट माणूस नाही.

हे विचार प्रेम नसल्यामुळे येत नाहीत. ते थकव्यामुळे येतात. दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

अडचण विचार येण्यात नाही. अडचण ते कुणालाच सांगता येत नाहीत, यात आहे. कारण सांगितलं तर लोक काय म्हणतील ही भीती असते.

म्हणून ते आत साचत राहतात. आणि साचलेला राग बहुतेकदा चुकीच्या वेळी, चुकीच्या माणसावर बाहेर पडतो — आणि मग अपराधीपणा वाढतो. हे चक्र मी रोज बघतो.

त्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे — ते कुणालातरी सांगणं. मैत्रिणीला, भावंडाला, डॉक्टरांना. बोललेला विचार साचत नाही.

हा ताण खरा असतो

“तुला काय झालंय, आजारी तर तो आहे” — हे वाक्य बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं.

पण दीर्घकाळ काळजी घेणाऱ्यांवर होणारा परिणाम हा अभ्यासलेला विषय आहे. त्यावर संशोधन आहे, आणि तो मोजण्याच्या पद्धतीही आहेत.

त्यात काय दिसतं? काळजी घेणाऱ्यांमध्ये झोपेचे त्रास, थकवा, चिडचिड, नैराश्य आणि चिंता जास्त प्रमाणात आढळतात. रक्तदाब आणि इतर शारीरिक त्रासही.

म्हणजे हे तुमच्या मनाचे खेळ नाहीत. ही एका खऱ्या ओझ्याची खरी प्रतिक्रिया आहे.

स्वतःच्या तब्येतीचं काय झालंय?

एक प्रश्न विचारतो, आणि प्रामाणिक उत्तर द्या.

गेल्या वर्षभरात तुम्ही स्वतःसाठी डॉक्टरकडे कधी गेला होतात?

बहुतेकांचं उत्तर “आठवत नाही” असं असतं.

जे बघितलं जातं ते असं — काळजी घेणाऱ्यांची स्वतःची तपासणी थांबते, औषधं अनियमित होतात, जेवण उभ्याउभ्या होतं, झोप तुटते, आणि स्वतःचं दुखणं “नंतर बघू” म्हणून पुढे ढकललं जातं.

आणि हे वर्षानुवर्षं चालतं.

तुमची तब्येत बिघडली तर त्यांचीही काळजी घेणारं कुणी उरणार नाही. हे भावनिक विधान नाही, हे साधं गणित आहे.

घर हळूहळू एकटं पडतं

हा भाग कुणी बोलत नाही, पण जवळपास प्रत्येक घरात होतो.

आधी बाहेर जाणं कमी होतं — कारण त्याला एकटं सोडता येत नाही, किंवा बाहेर काय होईल याची भीती वाटते.

मग पाहुणे येणं कमी होतं.

मग बोलावणी कमी येतात.

आणि काही वर्षांनी लक्षात येतं की घरातलं कुणीच कुठे जात नाही, आणि घरी कुणीच येत नाही.

यात आणखी एक गोष्ट असते जी उघडपणे बोलली जात नाही — घरातल्या इतर मुलांच्या लग्नाची काळजी. “कळलं तर स्थळ येणार नाही” या भीतीने बरीच कुटुंबं आजार लपवतात, आणि लपवण्यासाठी अजून एकटी पडतात.

यावर सोपा उपाय नाही. पण एक गोष्ट सांगतो — सगळ्यांपासून लपवण्याची गरज नसते. दोन-तीन माणसं जी खरी आहेत, त्यांना सांगितलं तरी पुरतं. पूर्ण एकटेपणा आणि पूर्ण उघडेपणा यात मधलं काहीतरी असतं.

"आमच्यानंतर याचं काय?"

वयस्कर आईवडिलांच्या मनातला हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि तो बहुतेकदा रात्री येतो.

यावर विचार करणं टाळलं जातं, कारण विचार करायलाही भीती वाटते. पण काही गोष्टी आधी करून ठेवता येतात.

एक — कागदोपत्री तयारी

मानसिक आरोग्य सेवा कायद्यानुसार व्यक्ती स्वतःचा प्रतिनिधी नेमू शकते, आणि पुढच्या उपचारांबद्दल आधीच लिहून ठेवू शकते. हे रुग्ण बरा असतानाच्या काळात करता येतं, आणि त्याने पुढे बरेच वाद टळतात.

याविषयी सविस्तर स्वतंत्र लेख दिलेला आहे.

दोन — अपंगत्व प्रमाणपत्र

हे बहुतेक कुटुंबांना माहीत नसतं, म्हणून वेगळं सांगतो.

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार मानसिक आजार हा मान्यताप्राप्त दिव्यांगत्वाच्या प्रकारांपैकी एक आहे.

म्हणजे तपासणीनंतर प्रमाणपत्र मिळू शकतं, आणि UDID कार्ड काढता येतं. अर्ज ऑनलाइन करता येतो आणि त्यासाठी शुल्क नाही; तपासणी शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत होते.

बहुतेक शासकीय सवलतींसाठी ४० टक्के किंवा त्याहून जास्त दिव्यांगत्व नोंदवलेलं असावं लागतं. प्रत्येकाला ते लागू होईलच असं नाही, पण एकदा विचारून बघण्यासारखं नक्की आहे.

तुमच्या डॉक्टरांशी याबद्दल बोला — कागदपत्रांत आणि प्रक्रियेत ते मदत करू शकतात.

तीन — भावंडांशी बोलणं

पुढे जबाबदारी कुणावर येणार, हे न बोलता गृहीत धरलं जातं. आणि गृहीत धरलेल्या गोष्टींवरून पुढे भांडणं होतात.

हे संभाषण अवघड आहे, पण ते तुमच्या हयातीतच व्हायला हवं. नंतर ते कुणीच करत नाही.

काय करता येईल

मोठे उपाय नाहीत. लहान आहेत, पण ते चालतात.

  • आठवड्यातून काही तास स्वतःसाठी ठेवा. कुणालातरी त्या वेळेपुरतं जबाबदारी द्या. सुरुवातीला अपराधी वाटेल; तरी करा.
  • जबाबदारी वाटून घ्या. “मीच करते” ही सवय बहुतेक घरांत तयार होते आणि मग इतरांना संधीच मिळत नाही. कुणाला काय जमेल ते ठरवून द्या — औषधांची जबाबदारी एकाकडे, दवाखान्याची दुसऱ्याकडे.
  • नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्ट तुम्हीच केली पाहिजे असं नाही.
  • स्वतःची तपासणी करून घ्या. वर्षातून एकदा तरी. तारीख आत्ता ठरवा.
  • तुमच्या झोपेकडे लक्ष द्या. झोप गेली की सगळंच अवघड होतं.
  • आजाराबद्दल माहिती करून घ्या. काय अपेक्षित आहे हे कळलं की भीती कमी होते.
  • तशाच परिस्थितीतल्या कुटुंबांशी बोला. “आमच्याकडेही असंच होतं” हे ऐकणं फार मोठा दिलासा असतो.
  • एक गोष्ट स्वतःसाठी ठेवा — जी आजाराशी संबंधित नाही. देवळात जाणं, फिरणं, गाणी, कुणाशी तरी फोनवर बोलणं. काहीही चालेल, पण ती सोडू नका.

तुम्हालाही मदत लागू शकते

आणि ती मागण्यात कमीपणा नाही.

यातलं काही होत असेल तर एकदा डॉक्टरांशी बोला —

  • झोप सतत बिघडलेली आहे
  • कशातच रस वाटत नाही, अगदी जे आवडायचं त्यातही
  • सतत चिडचिड होते आणि नंतर वाईट वाटतं
  • रडू येतं, किंवा उलट — काहीच वाटेनासं झालंय
  • तब्येतीच्या तक्रारी वाढल्यात आणि तपासणीत काही निघत नाही
  • झोपेसाठी किंवा शांत वाटण्यासाठी दारूचा आधार घ्यायला सुरुवात झाली आहे

आणि जर स्वतःच्या जगण्याबद्दलच नकोसे विचार येत असतील, तर वाट अजिबात बघू नका. टेली-मानस — १४४१६. मोफत, २४ तास, मराठीत. मदतीचं पानही बघा.

एक प्रसंग

(हा अनेक अनुभवांवरून तयार केलेला काल्पनिक प्रसंग आहे. कुठल्याही एका व्यक्तीचा नाही.)

सत्तर वर्षांच्या एक आजी. मुलगा चाळिशीचा, बरीच वर्षं आजारी. वडील दहा वर्षांपूर्वी गेलेले.

त्या दर महिन्याला त्याला घेऊन यायच्या. औषधांच्या वेळा तोंडपाठ. काय बदललं, कधीपासून — सगळं नेमकं सांगायच्या.

एका भेटीत डॉक्टरांनी विचारलं, “आणि तुम्ही कशा आहात?”

त्या क्षणभर थांबल्या. मग म्हणाल्या, “मला हा प्रश्न कुणी विचारला नव्हता.”

बोलता बोलता कळलं — त्यांचा रक्तदाब दोन वर्षांपासून तपासलेला नव्हता. गुडघे दुखत होते, पण “नंतर बघू” म्हणून राहिलं होतं. रात्री झोप लागत नव्हती.

आणि एक गोष्ट त्यांनी हळू आवाजात सांगितली — “कधीकधी वाटतं, माझ्या आधी याचं काहीतरी झालं तर बरं. आणि असं वाटलं की मला स्वतःचीच लाज वाटते.”

डॉक्टरांनी सांगितलं की हा विचार बऱ्याच आयांच्या मनात येतो, आणि तो प्रेम कमी असल्याचं लक्षण नाही.

त्या रडल्या. मग म्हणाल्या, “तीस वर्षांत हे मी कुणालाच सांगितलं नव्हतं.”

पुढच्या भेटीत त्यांनी स्वतःचा रक्तदाब तपासून घेतला होता.

प्रश्न आणि उत्तरं

माझ्या मनात राग येतो. मी वाईट आहे का?

नाही. राग हा थकव्याचा परिणाम आहे, प्रेम नसल्याचा नाही. तो दाबून ठेवल्याने वाढतो; बोलल्याने कमी होतो.

मी स्वतःसाठी वेळ काढला तर तो एकटा राहील

काही तासांसाठी दुसऱ्या कुणाकडे जबाबदारी देता येते. आणि हे टप्प्याटप्प्याने करा — आधी एक तास, मग जास्त. एकदम दिवसभर नको.

घरातले इतर लोक काहीच करत नाहीत

बऱ्याचदा त्यांना काय करावं हे माहीत नसतं, आणि विचारायला संकोच वाटतो. ठरवून, नावानिशी कामं वाटून द्या — “तू हे कर” हे “जरा मदत कर” पेक्षा जास्त चालतं.

आजाराबद्दल इतरांना सांगावं का?

सगळ्यांना नाही, पण कुणालातरी. दोन-तीन विश्वासाची माणसं पुरतात. पूर्ण गुप्तता ही सगळ्यात जास्त थकवणारी गोष्ट असते.

मी दमले आहे हे त्याला सांगू का?

सांगता येतं, पण आरोप न करता. “तुझ्यामुळे” ऐवजी “मला थकवा आलाय, मला थोडी मदत हवी” — हे दोघांसाठीही सोपं जातं.

आधार

  • दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ — मानसिक आजार मान्यताप्राप्त दिव्यांगत्वाच्या प्रकारांत
  • मानसिक आरोग्य सेवा कायदा, २०१७
  • टेली-मानस — आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

सूचना

हे पान माहितीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही आणि प्रत्यक्ष तपासणीची जागा तो घेऊ शकत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला त्रास होत असेल तर पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तातडीच्या परिस्थितीत १४४१६ किंवा ११२ वर फोन करा.

Scroll to Top