माणूसपण हिरावणारा आजार (Psychosis)

माणूसपण हिरावणारा आजार (Psychosis)

आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत असतात, ज्या चुकीच्या असतात हे कुठेतरी कळते पण त्यामध्ये अधिक लक्ष देऊन ते जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ नसतो किंवा आपला पूर्वग्रह आपल्या समजुन घेण्याला आडवा येतो. माणसाच्या वागणुकीत होणारा बदल ही देखील अशीच एक गोष्ट. अचानक किंवा बऱ्याच वेळा हळू हळू एखाद्याच्या वर्तणुकीत होत जाणारा बदल हा नक्कीच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच तर लेखनामध्ये, सिनेमा मध्ये आणि समाजामध्ये या गोष्टी वारंवार चर्चिल्या जातात, अर्थात फक्त उथळ मनोरंजनाच्या दृष्टीने. खुपच थोडे लोक याविषयी खोलात जाऊन माहिती घेतात. पण या अर्धवट आणि चुकीच्या माहितीमुळे बरेच गैरसमज समाजामध्ये रुजतात. आणि फक्त त्या पिढी पुरते न राहता तसेच पुढे पुढे जात राहतात. आणि मानसिक आजारी रुग्णाचे आयुष्य उध्वस्त करत राहतात. अशीच ही प्रातिनिधिक उदाहरणे.
©Muktesh
निफाड. जिथे मी व्हीजिट ला जातो, एक एकोणतीस वर्षांची ग्रामीण भागातील मुलगी, लग्न झालेली पण मागील सहा महिन्यांपासून माहेरी रहात असलेली भेटायला आलेली. भेटायला आल्या आल्या “डॉक्टर साहेब! भुतं धरत्यात हो मला, लयी तरास देत्यात, कानात शिव्या देतेत, मग मी पण शिव्या देते. पण मी शिव्या दिल्या की घरातले मलाच मारतेत. लयी भगत फिरून आले कुणालाच ही भुतं दाद देत न्हाईत. आता शेवटला उपाय म्हणून तुमच्याकडे आले हाय.”
तिची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर लक्षात आले की हिला सायकोसिस गटातील स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. ती मागील सहा महिन्यांपासून असे वागते आहे या आधी सर्व ठीक चालले होते. सध्या एकटे बोलते, झोपत नाही, रात्री अपरात्री शेतात फिरत असते, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत नाही, कोणी काही बोलले तर अंगावर धावून जाते. असेच सासु बरोबर काहीतरी जास्त झाल्यामुळे त्या लोकांनी हिला, मागचा पुढचा विचार न करता, लगेचच माहेरी आणून घातले होते.
माहेरची मंडळी मग गाववाल्यांचे ऐकून ‘बाहेरचे झाले आहे‘ असे समजुन बरेच बुवा बाबा फिरून आलेले. हजारोंनी पैसे खर्च करून आणि सहा महिने काहीच फरक न पडल्या मुळे शेवटी ते वेड्यांचा डॉक्टर म्हणजे माझ्याकडे आलेले. जेव्हा मी लक्षणे विचारू लागलो तेव्हा तिचे वडील “डॉक्टर ! एकदम बरोबर सांगताय तुम्ही, तुम्ही काय पाहून गेला व्हतात की काय आधी हिला, अशी शंका यावी इतके अचुक विचारून राहिले तुम्ही. आधीच्या भगतांना पण ह्या गोष्टी कळल्या नाहीत.” असे मधेच बोलले.
असे बऱ्याच वेळा घडते कारण आम्ही आजार समजुन घेण्यासाठी त्याची प्रमुख लक्षणे त्यांना समजेल अशा शब्दात विचारत असतो. मग मी ताण हलका करण्यासाठी गमतीने म्हणत असतो “जी भुतं भगताला काढता येत नाहीत ना ! ती आम्ही मनोविकारतज्ञ बाहेर काढतो. पण खरे सांगु का हा आजार आहे हो आणि आम्ही त्याचे डॉक्टर. हा आजार जेवढा लवकर लक्षात येईल ना तेव्हढे चांगले. वेळेत सुरू झालेला औषधोपचार त्या व्यक्तीचे आयुष्य बदलावणारा ठरतो.” ©Muktesh
“आज तुम्ही जे काही बोललात ना, हे आम्हांला आधी माहिती असते तर आम्ही कशाला हे सगळे करत बसलो असतो, अडाणी असु पण ‘येडे’ थोडीच आहोत आम्ही.” त्यांनी ज्या पद्धतीने ‘येडे’ शब्द वापरला ना आम्ही दोघेही मनापासून हसलो. ते हसले कारण हा आजार आहे, ह्याची सगळे लक्षणे डॉक्टरांनी समजावुन सांगितली आहेत, याच्यावर उपचार असतो आणि उपचाराने आजार आटोक्यात आणता येते हे त्यांना कळले होते. बऱ्याच वेळा आपल्या माणसाला जो त्रास होतोय हा आजारामुळे होतोय, तो लक्षात आलेला आहे आणि त्याचे उपचार चालू झाले आहेत, हीच गोष्ट नातेवाईकांचे टेन्शन कमी करणारी असते. मी हसलो कारण मी मानसिक आरोग्य क्षेत्रात एक सैनिक तयार केला होता. तिचे वडील म्हणाले देखील आता आमच्या पंचक्रोशीत असे काही आढळले तर मी त्यांना तुमच्या सारख्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देणार आहे. अशी खरी खुरी अनुभवातून आलेली समज खुप दिवस टिकणारी आणि खरंच विधायक गोष्टी घडवणारी असते. गावांकडे बाहेरचे झाले आहे यापेक्षा हा एक मेंदूचा आजार आहे ही गोष्ट पटकन आपलीशी होते आणि ते इतरांना वेळप्रसंगी सांगायला अजिबात मागे पुढे पहात नाहीत. त्यानंतर तिचे वागणे बोलणे यातले संदर्भ त्यांना समजावुन सांगितले, औषधांचे महत्व पटवून दिले आणि अश्या गरजु लोकांना वेळेत डॉक्टरांकडे पाठविण्याचा सल्ला द्यायला अजिबात विसरलो नाही. ते सुद्धा समाधानाने परत येण्याचे आश्वासन देऊन पेशंटला घेऊन गेले. ©Muktesh
ग्रामीण भागात काम करताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ही की, या लोकांना खरंच ह्या आजारांबद्दल माहीत नसते आणि ते त्यांच्या आधीच्या अनुभवानुसार या अडचणींना तोंड देत असतात. एकदा की यांना खऱ्या गोष्टी कळाल्या की त्यानुसार ते खुप लवकर बदलतात. ग्रामीण भागात मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करायचे असेल तर जनजागृती, मानसिक आरोग्याविषयी शास्त्रीय माहिती आणि त्याचा पाठपुरावा एवढे पुरेसे असते.

दुसरी एक रुग्ण पस्तीस वर्षांची दुसऱ्या जिल्ह्यातून दोनच दिवसांपूर्वी आलेली पण या दोन दिवसात त्या कुटुंबात एकदम गोंधळ करून टाकणारी अशी होती. ती आली तेव्हा तिचे दीर जे की एकत्र कुटुंबाचा भाग होते, एकदम भांडणाच्या पवित्र्यात होते. “हिने संपूर्ण गल्ली मध्ये घराण्याची इज्जत घातली नुसता गोंधळ घातलाय. आमच्या सात पिढ्यात हे असे कधी घडले नाही. शिव्या देते आहे, कपड्यांची लाज शरम नाही, घरातील कपडे हिने काल जाळून टाकले, फक्त मला आणि माझ्या बायकोला खुप घाण घाण शिव्या देते आहे. काल रात्रभर झोपली नाही, आम्ही अजिबात हिला घरात ठेवणार नाही. मी यांच्यापेक्षा जास्त प्रगती केलेली हिला सहन होत नाहीये, म्हणून ती आम्हां दोघांना त्रास देते आहे. हा माझा भाऊ म्हणतो, हिला ह्याच्या आधी एकदा, जेव्हा ते दोघे गावी राहायचे तेव्हाही असेच झाले होते, आणि वरून म्हणतोही की, हा एक मानसिक आजार आहे. पण मी पण जग पाहतो, एव्हढे वेडे पाहिले पण असे नाही पाहिले कुठे. ही वेडी नाहीये ही नाटक करते आहे. फक्त मला आणि माझ्या बायकोला घाण घाण शिव्या देते, आणि स्वतः च्या मुलीला एकदम छान जपते. असा थोडी वेडेपणा असतो. त्यात भरीस भर म्हणून तिच्या भावाचा धमकी-वजा फोन येऊन गेलेला की तुम्ही तिची काळजी घेत नाही म्हणून तिला असा त्रास होतोय.” त्यांचे बोलणे ऐकून घेतले मग नेहमीसारखी व्यवस्थित माहिती घेतल्यावर लक्षात आले. हिला Acute Transient Psychotic Disorder आहे म्हणजे सायकोसिस चा एक प्रकार, हा पटकन होणारा, थोडे दिवस टिकणारा आणि छान बरा होणार आजार आहे. यामध्ये स्किझोफ्रेनिया सारखी लक्षणे असतात पण व्यवस्थित औषधाने लवकर बरा होतो. ©Muktesh
यामध्ये अगदी एक दिवसामध्ये सुद्धा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात आणि भावनांमध्ये कमालीचा फरक पडतो. खुप चिडचिडेपणा, संशयी स्वभाव, स्वतः ची काळजी न घेणे जसे की जेवण करणे, झोपणे आणि स्वच्छता या देखील व्यवस्थित होत नाहीत. कपड्यांची लाज शरम, नातेसंबंधामधील मान सन्मान याचा एकदम गोंधळ होऊन जातो त्यामुळे उद्धटपणे वागणे बोलणे होते. आणि हा त्रास घरातील सगळ्यात जवळच्या माणसांनाच सहन करावा लागतो. अगदी कल्पने पलीकडे यांचे वागणे बोलणे होऊन जाते, अर्थपुर्ण संवाद त्यांच्याशी करताच येत नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी केलेला मदतीचा प्रयत्न सुद्धा व्यर्थ जातो आणि नातेवाईकांच्या चिडचिडीचे कारण बनतो. “हिला किती समजावुन सांगतोय समजतच नाहीये,” ही नातेवाईकांची नेहमीचीच तक्रार असते.
पण हे उदाहरण देण्याचे कारण यामध्ये जो नातेवाईक दीर आहे तो सुशिक्षित आहे, त्यांच्या मते त्यांना वेडेपणाचा आजार माहिती आहे आणि ते ह्या मतावर ठाम आहेत की, ही रुग्ण जे काय करते आहे ते नाटक आहे आजार नाही. अश्या नातेवाईकांना काही रुग्णांनीच दिलेला ‘गुगल डॉक्टर’ हा किताब लागु पडतो. कारण यांना माहिती असते पण ती अर्धवट माहिती आहे हे त्यांना कळत नाही. मग ते उसने शहाणपण खुप टिकवायचा प्रयत्न करतात. अश्या प्रकारच्या नातेवायीकांमुळे रुग्णाचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. कारण आम्ही तज्ज्ञांनी सांगितलेले त्यांना ऐकायचे नसते आणि आमच्याकडून मदत पण हवी असते. तरीसुद्धा आम्ही डॉक्टर मंडळी अश्या नातेवाईकांना समजावुन घेण्याचा प्रयत्न करतो कारण अर्धवट ज्ञान जरी दाखवत असले तरी त्यांना रुग्णामुळे होणारा त्रास खराखुरा असतो. व्यवस्थित त्यांचे ऐकुन घेऊन त्यांच्या आजार समजण्यात झालेला गोंधळ त्यांना पटवून दिला की ही मंडळी मोठ्या कष्टाने पुढील उपचारासाठी तयार होतात. परंतु यांना जर नाही समजावले तर प्रत्येक वेळेस उपचारांमध्ये हे खोडा घालतात. ©Muktesh
हे खरंच वेळखाऊ आणि डोकेखाऊ काम असते. माहिती असलेल्या माणसाला एकवेळ शिकवणे सोपे पण अर्धवट आणि चुकीची माहिती असलेल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक दिव्य असते. आणि डॉक्टरांच्या आयुष्यात आता अशी दिव्ये खुप येत आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही. “उपचारांची माहिती घेणे वेगळे आणि उपचारांवरती शंका घेणे वेगळे.” हा बदल कोणाच्याही लगेच लक्षात येण्यासारखा असतो. हा नियम फक्त मानसिक आरोग्य नाही तर एकूणच सगळ्या आरोग्याच्या क्षेत्राला सध्या लागू पडतोय. शंकेच्या सुरात जर तुम्ही बोलणार असाल तर डॉक्टर मंडळी पण मग कायद्याने ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याची मदत घेतात.
©Muktesh
या आजारांच्या गटामध्ये आणखी फक्त शंकेचा आजार (Delusional Disorder) आणि बाळंतपणानंतर वर्तणुकीत होणारा बदल (Post Partum Psychosis) ह्या दोन आजारांचाही समावेश होतो.
हे सगळे लिहिण्यामागे तुम्हांला आजाराची माहिती व्हावी हा उद्देश नाहीये, ते पुन्हा कधीतरी. तर नातेवाईकांचा आणि समाजाचा मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाहीये तो पर्यंत उपचारांचे महत्त्व, उपचारामधली दिरंगाई आणि त्याविषयीचे गैरसमज आपण टाळू शकत नाही.

हे अनुभव वाचल्यानंतर, सायकोसिस किंवा वेडेपणाचा आजार हा एक मेंदूचा आजार असतो. याचा उपचार मनोविकारतज्ञ करतात आणि सगळ्यात महत्वाचे वेळेत चालू झालेला उपचार त्या व्यक्तीचे आयुष्य बदलवतो. आणि हे होण्यामध्ये आपला आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असणे खुप गरजेचे आहे, हे जरी सर्वांना कळाले तरी याचा उद्देश सफल झाला असेच मी समजेन. ©Muktesh
भावना, विचार आणि वर्तणूक ह्या माणसाला माणूसपण देणाऱ्या गोष्टी आहेत. या प्रकारच्या आजारांमध्ये ह्याच्यावरच परिणाम होतो आणि त्यामुळे त्या रुग्ण व्यक्तीचे माणूसपण धोक्यात येते किंवा हिरावले जाते असे म्हणूया. पण या दरम्यान तिच्या जवळच्या व्यक्तींनी माणूस पणाला जागून जर त्या व्यक्तीची योग्य ती काळजी घेतली तर तिचे हरवलेले माणूसपण परत मिळवण्यात ह्याचा खुप मोठा वाटा असतो.

#मुकाम्हणे

डॉ. मुक्तेश दौंड
मनोविकार तज्ज्ञ
निम्स हॉस्पिटल, नाशिक
www.mindbrainandpsychiatry.com