तंबाखु दुष्परिणाम समजूया.. (World no tobacco day)

तंबाखु दुष्परिणाम समजूया.. (World no tobacco day)

               मनोविकार तज्ञ म्हणून काम करताना काही चमत्कारिक (हा शब्द मुद्दाम योजला आहे. चमत्कारिक म्हंटले कि वाचकाची वाचनाची इच्छा जागृत होते.) गोष्टी रोजच घडत असतात.

               यामधीलच जवळ जवळ रोज अनुभवाला येणारी गोष्ट. ओपीडी मध्ये रुग्णाची त्याच्या आजाराच्या अनुषंगाने माहिती घ्यावी लागते, पण काही प्रश्न आम्ही डॉक्टर लोकं मुद्दामहून विचारतोच. त्यातला एक महत्वाचा प्रश्न, काही व्यसन वगैरे करता का तुम्ही ?(हा प्रश्न स्त्री-पुरुष, लहान-मोठा, गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता सगळ्यांनाच विचारतो आम्ही. खरेतर व्यसनाचे प्रमाण खुप जास्त असेल तर, शरीरात होणार्या बदलांवरून आम्ही याचा अंदाज मनाशी बांधलेला असतो, पण खातरजमा नेहमीच आवश्यक असते.)

               आजकाल याला उत्तर बऱ्याच वेळा दुर्दैवाने हो असे असते.(सुशिक्षित लोक यामध्ये जास्त येतात.) पण जे नाही म्हणतात (असा अजुनही मोठा वर्ग आहे.) त्यांना आम्ही पुढे विचारतो, “तंबाकू घेता कि नाही, “घेतो कि !” “मग व्यसन नाही करत म्हणालात त्याचे काय ?” “फक्त तंबाकू घेतो हो ! बाकी कुठलेच व्यसन नाही, सर्वच जण खातात कि ! त्यामुळे तंबाकू खाणे व्यसन थोडीच आहे.” ?”(ग्रामीण भागामध्ये अजुनही याविषयी म्हणावी अशी जागृती नाही.) हि झाली चमत्काराची पहिली पायरी.

               दुसरी म्हणजे, “छे हो डॉक्टर ! आम्ही खुप नाहीच खात मुळी. फक्त दिवसाला दोन एक पुड्या होतात.” किंवा बिडी पिणारे सांगतात, “एखादा कट्टा होवून जातो हो. पण तेवढंच आमच्या पेक्षा जास्त खाणारे आणि फुंकणारे आहेत, त्यांना काहीच होत नाही तर आम्हांला कसे काही होईल.” तिसरी पायरी म्हणजे, “ आता सवय लागली आहे हो ! सोडण्याचा विचार सुद्धा येत नाही. जर काही त्रास नाहीच आहे, तर आता मेल्यानंतरच सुटायची आमची हि सवय आता. म्हनतेत ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.” इति.

               तर ह्या प्रातिनिधिक (जसे प्रत्येकाची लव्ह स्टोरी वेगळी असते ना, तशीच प्रत्येकाची व्यसनाची स्टोरी वेगळी असते.) गोष्टी सांगण्याचे प्रयोजन यासाठी कि, आज आहे जागतिक तंबाकू विरोधी दिवस.(३१ मे १९८८ पासून दरवर्षी हा दिवस #WorldNoTobaccoDay म्हणून साजरा केला जातो.)तंबाकूच्या व तंबाकूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे व वापरामुळे होणाऱ्या विविध वाईट परिणामांविषयी जन-जागृती करणे व तंबाकू व तंबाकूजन्यपदार्थांपासून लोकांना दूर करणे व त्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

   आकडे बोलतात. महाराष्ट्र टाईम्स नागपूर साभार   (http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-today-is-anti-tobacco-day/articleshow/58916281.cms)

तंबाखूमुळे दगावणाऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी ग्लोबल युथ टोबॅको संस्थेने एक अभ्यास केला. त्यातले निष्कर्ष धक्कादायक आहेत. काय म्हणतो हा अभ्यास…

१) भारत हा तंबाखूचे उत्पादन करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश.

२) जगभर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ४० लाखांहून अधिक मृत्यू.

३) तंबाखूमुळे दगावणाऱ्यांमध्ये सात टक्के व्यक्ती तिशीच्या आतील.

४) प्रगतिशील देशांमध्ये तंबाखूसेवन करणारे ८० टक्के लोक मध्यवर्गीय गटातील.

५) तंबाखूसेवन करणाऱ्या ३४ टक्क्यांपैकी पुरुषांचे प्रमाण ४७ टक्के तर २० टक्के महिला.

६) १४ टक्के व्यसनाधीन तरुणांमध्ये मुलांचे प्रमाण २४ तर मुलींचे प्रमाण ४ टक्के.

७) धूम्रपान करणाऱ्यांत २४ हजार तरुण १३ ते १५ वर्षे वयोगटातील.

८) व्यसनाच्या आधीन गेलेले १५ टक्के मुले शाळकरी.

९) दर दहांत एक मुलगा सिगारेट, तंबाखूच्या आहारी.

१०) चौघांत एक जण तंबाखूच्या आहारी.

११) देशात दरवर्षी ६ लाख मृत्यू अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे.

१२) भारतात ५८ टक्के मृत्यू शहरी भागातले तर ३९ टक्के मृत्यू ग्रामीण भागात.

तर हे आकडे पाहिल्यानंतर आपल्याला परिस्थितीचे गांभीर्य कळाले असेलच.

               आता वळुया दुसरी पायरीकडे  (चमत्काराच्या नाही हं तर तंबाकू सेवनाविषयी असणाऱ्या अज्ञान किंवा गैरसमजुतीच्या.) तसे पहायला गेले तर शास्त्रीय दृष्ट्या सोडवायला, सर्वात अवघड असे हे तंबाकूचे व्यसन आहे, कारण त्याची व्यसन लागण्याची क्षमता सर्वात जास्त आहे.(Most addictive substance.) एकदा जरी कोणी तंबाकूचे सेवन केले असेल तरी, आयुष्यभर ते परत सेवन करण्याची इच्छा होवू शकते.(singleexposure can cause life long craving.आणि महत्वाचे म्हणजे त्याला मिळालेली सामाजिक मान्यता आणि त्यामुळे असणारी मुबलक उपलब्धता. खुप वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे उपलब्ध आहे. मुख्यतः चावून खाण्याचे प्रकार आणि जाळून धूर ओढण्याच्या प्रकारांमध्ये यांचे वर्गीकरण करतात.(Chewable and smokable).

               तर अज्ञानामुळे अश्या या तंबाकू सेवनाचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतच राहतात. यामध्ये प्रामुख्याने तोंडाचे व  फुफुसाचे होणारे कैन्सर ( कर्करोग ) व त्यामुळे होणारा मृत्यू हा सर्वात मोठा परिणाम. त्यासोबतच हृदयाचे व रक्तवाहिन्यांचे विकार , श्वसनसंस्थेचे विकार जसे कि अस्थमा,ब्रॉन्कायटिस इत्यादी आजार, मेंदूला रक्ताचा अपूर्ण पुरवठा व त्यामुळे येणार पक्षाघात किंवा इतर आजार हे काही महत्वाचे आरोग्यावर होणारे परिणाम आहेत. त्याचबरोबर पचनसंस्थेचे आजार, यामध्ये अपचन, जळजळ, बद्धकोष्ट हे सर्रास आढळणारे दुष्परिणाम आहेत.

               तंबाकूच्या व तंबाकूजन्य पदार्थांच्या वापरामुळे त्या व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबावरती, लहान मुलांवरती व सहवासातील इतर व्यक्तींवरही मोठा परिणाम होतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती घरामध्ये, ऑफिसमध्ये, हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट किंवा बिडी ओढत असते त्यावेळी तो धूर व सिगारेट/ बिडी मधील केमिकल्स इतरांच्या शरीरात जातात. अशा तंबाखूच्या धुरामध्ये ४००० पेक्षा अधिक केमिकल असतात त्यापैकी जवळपास २५० केमिकल हे मानवाच्या आरोग्यास अपायकारक असतात तर तब्बल ५० केमिकल हे कैन्सर होण्यास कारणीभूत असतात. हे यासाठी महत्वाचे आहे कि, ती व्यक्ती स्वतः बरोबर तिच्या आसपासच्या लोकांच्या आरोग्यावर सुद्धा आघात करत असते.

               आता वळुया आपल्या तिसऱ्या पायरीकडे. आतापर्यंत आपण पहिले कि तंबाकू सेवन हा किती गंभीर प्रश्न आहे आणि त्यामुळे होणारे शरीरावरील परिणाम. आता एवढी शास्त्रीय माहिती मिळाल्यावर खुप सर्वांना हे व्यसन सोडावेसे वाटू शकते. तर आपण काय करू शकता.

१) सर्वप्रथम आपणांस तंबाकू सोडण्याचा निश्चय करावा लागेल. याला पाठबळ मिळण्यासाठी आपण आपली सध्याची परिस्थिती एकदम त्रयस्थपणे पहायला शिका, थोडक्यात हे मान्य करा कि आपले तंबाकू सेवन ही आपल्या आयुष्यातील एक चुक आहे.

२) जर चुक असेल आणि आपण ती मान्य करत असू तर, ती सुधारणे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. जेव्हा व्यसन जास्त प्रमाणात असते त्यावेळेस मनोविकारतज्ञाची भेट अवश्य घ्यावी.

३) व्यसनामुळे झालेले शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिणाम लिहून काढा.

४) तंबाकू सेवन बंद केल्यास आपल्या आयुष्यात काय चांगले बदल घडून येतील ते लिहून काढा.

५) मनोविकारतज्ञाशी बोलून बंद करण्याचा दिवस ठरवा.(Quit Date)

६) कुटुंबियांचा या प्रवासामधील सहभाग खुप महत्वाचा आहे.

७) तल्लफ नियंत्रणाच्या युक्त्या शिकून घ्या.(Craving Managment)

८) मला इथून पुढे कधीच व्यसन करायचे नाहीये असा विचार करण्यापेक्षा मी आजच्या दिवस व्यसन करणार नाही, उद्याचे उद्या पाहू असा दृष्टीकोन ठेवावा.

               आमचे शिक्षक गमतीने म्हणायचे “Wills Power is Greater than Will Power.” पण योग्य माहिती, व्यसन सोडण्याची मानसिकता आणि मनोविकारतज्ञांचे मार्गदर्शन या तिन मकारांनी आपण या विकाराचा पराभव नक्कीच करू शकतो.