मनोलॉजी ( The study of mind and brain )

मनोलॉजी ( The study of mind and brain )

मनाचा अभ्यास करूया शास्त्रीय दृष्टीकोनातून.

                 सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्यविषयी बदलत्या वातावरणामध्ये मनाचे आरोग्य खुप महत्वाचे ठरत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वस्थ मनाची माहिती, मानसिक आजार, व्यसने, वर्तणुकीच्या समस्या, उपचार पद्धती आणि मानसिक आजार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी यांचा अंतर्भाव होतो.तसेच मानसिक आजार हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली छाप सोडून जातात, जसे की लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या, शैक्षणिक आणि बौद्धिक अडचणी. वृद्धांच्या वयाबरोबरच असणारी शारीरिक आणि मानसिक आजारांची गुंतागुंत. मनाचे आरोग्य दोघांच्याही म्हणजे स्त्री आणि पुरूष यांच्या आयुष्यावर सारखाच परिणाम करते सकारात्मक आणि हो नकारात्मक ही, स्त्रिया मानसिक दृष्ट्या खंबीर असतात ही अशीच एक गैरसमजुत आहे.

               ह्या आजारांची तीव्रता जास्त असताना ते जीवघेणे तर असतातच, पण त्याहीपेक्षा त्यांचा आजारी व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रचंड असतो. असे असुनही या आजारांविषयी असलेल्या शंका आणि गैरसमजुतीमुळे हे आजार लपवुन ठेवले जातात आणि त्यामुळे ज्या व्यक्तीला हा आजार झाला आहे त्याच्या आयुष्याचा दर्जा उत्तरोत्तर खालावत जातो.

               २०१५ -१६ मध्ये झालेल्या शासनाच्या सर्वे मध्ये असे आढळुन आले आहे की, १५ % भारतीयांना (१८ वर्षांवरील) कुठल्या तरी एक प्रकारच्या मानसोपचाराची गरज आहे. (National Mental Health Survey of India, 2015-16) सर्वात महत्वाचे म्हणजे हे आजार तरुणाई मध्ये जास्त आहेत. (ज्यावर कुठल्याही देशाची प्रगती अवलंबुन असते.) आणि खटकणारी गोष्ट म्हणजे आपली आरोग्य व्यवस्था या आजारांचा सामना करण्यास अगदीच तोकडी आहे.

या सर्वे मध्ये पुढे आलेले काही प्रमुख गैरसमज

१)  मानसिक आजार हे जादूटोण्या मुळे होतात .

२) शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरी थोडाफार फरक असला तरी लोक अश्या व्यक्तींना कमकुवत, घाणेरडे, त्रासदायक आणि धोकादायक समजतात.

३)  खुप लोकांना असे वाटते त्यांना बुवा बाबा हेच बरे करू शकतात नाहीतर, अश्या आजारांवर उपचारच उपलब्ध नाहीये.

४) सगळ्याच मानसिक आजारांना आयुष्यभर औषध उपचार करावा लागतो, त्याचाच विचार करून उपचार टाळले जातात आणि अश्या व्यक्ती मग खुपच दुर्दैवी आयुष्य जगतात.

५) काहींच्यामते एकदा मानसिक रोगी म्हणजे कायमचाच रोगी. (Once mentally ill, always mentally ill.)

               समाजाच्या या दृष्टिकोनामुळे मनोविकार तज्ञांना भेटण्याआधी, भलतेच उपचार केले जातात. यामुळे मानसिक आजार घरच्यांपासून आणि समाजापासुन लपवण्याकडे कल वाढतो आणि उपचारामध्ये टाळाटाळ केली जाते. या सर्वांचा परिपाक म्हणजे उपचारांमध्ये होणारा उशीर.

               “The Community interferes with the treatment, they force them to take help of Bhopas and go to jhadufounk which only lengthens, worsens the problem of the patient and makes them chronic sufferers.”(NMHS)

               त्यात भरीस भर म्हणजे, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात झालेल्या अमुलाग्र सुधारणा नंतरही समाज आणि प्रसार माध्यमे त्यांच्याविषयी उपहासात्मक नजरेतून पाहतात. चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि आता सोशल मेडीया (सन्माननीय अपवाद सोडुन) यातुन मिळणारी अर्धवट, उथळ आणि अतिरंजित माहिती हे सर्व मानसिक आजार आणि मानसिक आरोग्याभोवती गुढतेचे वलय वाढवतात आणि त्यातुन आपण आपल्या समाजाचे खुप मोठे नुकसान करत आहोत याची त्यांना जाणीव सुद्धा नसते.

                 तर असे सर्व असताना, एक मनोविकारतज्ञ म्हणून या क्षेत्रात काम करताना, नेहमीच जाणवणारी कमतरता म्हणजे याविषयी असणारा शास्त्रीय माहितीचा मराठी भाषेमध्ये असणारा अभाव. अशी माहिती जर आपल्या मातृभाषेमध्ये जर मिळाली तर किती छान. तर ही त्रुटी भरून काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. खरेतर हे खुप मोठे काम आहे याची मला पुर्ण जाणीव आहे, हे एकदा करून संपणारे काम नक्कीच नाही, तर माझ्यामते ही एक दीर्घकाळ चालणारी ज्ञानार्जनाची प्रक्रिया आहे. प्रक्रिया यासाठी म्हणतोय की ह्या ज्ञानाच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत जाणाऱ्या आहेत, जर नवीन नवीन माहिती येणार आहे तर आपल्याला थांबुन चालणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हे काम पुढे नेऊया. आपण फक्त शास्त्रीय माहिती जरी गरजू लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तरी आपण त्या व्यक्तीचे आयुष्य बदलणार आहोत, या भावनेनी हे काम करूया. चला तर मग एका नवीन मोहिमेला सुरुवात करूया. आपल्या मनाकडे, त्याच्या मनोव्यापारांकडे आपणच लक्ष दयायला शिकुया आणि यातुन खरे पुर्ण आरोग्य (शारीरिक आणि मानसिक) मिळवूया. आपण आता भेटत राहूच. पण आता थांबतो.

टीप :- मानसिक आरोग्याचा आधुनिक अभ्यास हा जर्मन आणि इंग्लिश या भाषांमध्ये जास्त झालेला आहे. तरी आपण भाषेच्या मर्यादांमध्ये राहूनच या गोष्टी जाणुन घेवूया, शिकुया, आत्मसात करूया आणि सर्वात महत्वाचे त्यावर कृती करून  आपले आयुष्य बदलूया. हे यासाठी सांगतोय की बऱ्याच वेळा केवळ भाषेचा आग्रह धरल्यामुळे सोप्या गोष्टी अवघड होवून बसतात. आपला उद्देश माहिती घेणे हा आहे, भाषांतर नाही. ह्या नवीन मोहिमेमध्ये मी एक मनोविकारतज्ञ आहे लेखक नाही, हे ही लक्षात ठेवावे ही विनंती.