मानसिक आरोग्य स्वैर विचार ( Mental Health )

मानसिक आरोग्य स्वैर विचार ( Mental Health )

               १० ऑक्टोबर हा दिवस १९९२ सालापासून जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो . याचे उद्दीष्ट आहे समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९४८ मध्ये आरोग्याची व्याख्या करताना मानसिक आरोग्याला महत्वाचे स्थान दिले होते .
पण एवढा कालावधी लोटल्यानंतरहि ,आज मानसिक आरोग्य हा आपला दुर्लक्षित किंवा दुय्यम स्थान असलेला विषय आहे, हे वेगळे सांगायची गरज नाहीये.
मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला आजकाल घरात – दारात – समाजात सगळीकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते . जसे काही त्याला आजार आहे म्हणजे त्याची काहीतरी चूक आहे. आणि मग आपण त्याला मदत (ज्याची तो अपेक्षा करतो आणि त्याला खरंच मदत हवी असते ) करण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानतो .
ऐवढेच करून आपण थांबत नाही तर , ज्या कुटुंबाला मदतिची सर्वात जास्त गरज आहे त्यांना आपण वाळीत टाकतो . अवहेलना , हेटाळनी आणि चेष्टा -मस्करी ह्या गोष्टी त्या कुटुंबाच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग होवून जातात .

मग प्रश्न पडतो आपण शिक्षण घेतले म्हणजे आपण खरच सुज्ञ झालो का ?
आपण मानसिक आरोग्याबद्दल बरेच काही बोलतो . पण त्यात शास्त्रसंगत किती बोलतो आणि ऐकीव माहितीवर (जि बऱ्याच वेळा चुकीचीच असते ) किती बोलतो ह्याचा सारासार विचार व्हायला हवा .
त्यात भरीस भर आपली मनोरंजन माध्यमे. सिनेमामध्ये केलेले मानसिक आजारांचे विकृतीकरण , मनोरंजनासाठी त्याचा केलेला वापर हा गोंधळात भर टाकणाराच आहे .
मग जर योग्य माहितीच मिळत नसेल तर गैरसमज आलेच , गैरसमज आले म्हणजे त्याचे तोटे आलेच .

१) आपण स्वतःहून माहिती शोधत नाही .
२) चुकीची माहिती पुढच्या पिढीला तशीच किंवा जास्त विकृत करून सांगतो .
३) ज्यामुळे मानसिक आजार असणार्यांचे नुकसानच जास्त होते .
४) समाजाच्या मुख्य प्रवाहापासून ते वेगळे पडतात .
आणि या सर्व गोष्टी मुळे गैरसमज आणखी गडद होतात .

               मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे . हे असे क्षेत्र आहे जे अजुनही लोकांना अगम्य , गूढ , जादुयी आणि विक्षिप्त वाटते. या क्षेत्रात जे चालले आहे ते त्यांच्या समजण्याच्या पलीकडचे वाटते . त्यामुळे माझ्यामते उत्सुकता , भय आणि अपुरी माहिती या गैरसमज वाढवणाऱ्या गोष्टी आहेत . या कारणास्तव माझी सर्वांना विनंती आहे.

१) मानसिक आजारांबद्दल शास्त्रीय माहिती घ्या (प्रयत्न तर करा )
२) मानसिक आजार लपवु नका .
३) योग्य वेळेत मदत घ्या.
४) योग्य मदत उपलब्ध आहे .
५) तज्ञांचे मार्गदर्शन घ्या .
६) योग्य शास्त्रीय उपचार उपलब्ध आहे .
७) योग्य माहिती इतरांना सांगा .
८) जे गरजु आहेत त्यांनाहि आपण मदत करूयात .
९) मानसिक आजार असलेल्यांना समाजातील मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी मदत करूयात .