वैश्विक आजारांच्या साथी आणि आपले मानसिक आरोग्य भाग १

वैश्विक आजारांच्या साथी आणि आपले मानसिक आरोग्य भाग १

                   सार्स , इबोला , H१ N१ आणि झिका यांनी आपल्याला आपण साथींच्या आजारांमध्ये किती अस्वस्थ होऊ शकतो याची जाणीव मागील वीस वर्षात आपल्याला करून दिलेली आहे. यांच्या आधी अंदाजे शंभर ते एकशे वीस वर्षांपूर्वी आणि त्याआधी अशा साथी येऊन गेल्या आहेत पण तेव्हा मानसिक आरोग्याचे क्षेत्र अगदीच बाल्यावस्थेत होते, त्यामुळे अशा विषयाला हात घालण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता.

                           पण निरीक्षणांवरून असे लक्षात आले आहे की , लोकांची अशा आजारांविषयीची काळजी आणि भीती ही  देखील येते.ती अगदी लाटेसारखी येते, वाढते, फुगते आणि त्यानंतर कमी होते. अगदी त्या साथीच्या आजारां सारखी. त्यामुळे या दोन्हीं म्हणजे आजाराच्या आणि भावनेच्या लाटेला समजुन घेणे आवश्यक आहे. या विचारांतूनच  हि लेखमाला लिहिण्याचा विचार आला.
                        यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की सध्याच्या कोरोना (COVID १९) साथीच्या आजाराने प्रगत देश, विकसनशील आणि अप्रगत देश यांना एका रांगेत आणुन बसवले आहे. तुमचे राहणीमान, आरोग्यव्यवस्था आणि खर्च करण्याची ताकद अशा गोष्टींनी या आजाराच्या  प्रसारामध्ये काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे प्रगत देशातील नागरिक सुद्धा आपल्याइतकेच घाबरलेले आहेत. असे साथीचे आजार आपले धर्म, देश आणि राजकारण अशा काल्पनिक वाटण्यांना अजिबात महत्व देत नाहीत आणि आपल्याकडे या पृथ्वीवरील एक प्राणी इतक्या स्वच्छ नजरेतून पाहतात.
   

    माझ्यामते ही आपल्यातील बऱ्याच जणांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी गोष्ट असेल. असे असुन देखील या मानसिक आरोग्याच्या गोष्टींकडे सगळीच सरकारे नेहमीसारखी दुर्लक्ष करत आहेत. जेथे आरोग्य हेच मुळी प्राधान्य नसेल तेथे मानसिक आरोग्याची काळजी हा स्वप्नविलास ठरतो. पण म्हणून मनोविकारतज्ज्ञ गप्प अजिबात नाहीयेत, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पातळीवर हे शिवधनुष्य उचलतो आहे, कोणी टाळ्या वाजवू अगर न वाजवू. “गरज सरो वैद्य मरो” अशी म्हण आपल्याकडे यावी, ती टिकावी आणि लोकांनी ती सार्थ ठरवावी. असे असताना देखील प्रत्येक डॉक्टर त्याची भुमिका  चोख बजावत राहील, यात मला मी डॉक्टर असण्याचा सार्थ अभिमान तर आहेच. पण माझ्या डॉक्टर मित्रांबद्दल कृतज्ञता पण आहे.

     

   हे लिहिण्याचे कारण कृतज्ञता अंगी बाणवा हा माझा पहिला मुद्दा असेल. आपण आज घरात बसुन, हाफ चड्डी घालून, गरम गरम वरण भात खात, टिव्ही पहात , कोणी काय करावे ? कोण कसे चुकला ? राजकारण ! धर्म ! लोकांच्या चुका काढत बसणे. हातात नसलेल्या गोष्टींबद्दल काळजी करत बसने. आणि सगळ्यात महत्वाचे सोशल मेडिया वापरून अफवांच्याही अफवा तयार करणे असे त्रास वाढवणारे उद्योग करत आहोत. आपण आणखी त्रास वाढवला नाही तरी सरकार, पोलीस, डॉक्टर, लॅब, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पाणी-वीज पुरवठा करणारे, बँका, हे सगळे आपले खुप खुप आभारी असतील. हवे असेल तर यांच्या वतीने मी आधीच आपले आभार मानतो. हा त्रास जरी आपण कमी केलात तरी आपण आता राष्ट्रभक्ती नाही तर वैश्विकभक्ती करत आहात हे वेगळे सांगण्याची गरज मला नाही.

     

  आपल्या परीने खारीचा वाटा ज्याने त्याने उचलावा, एवढीच ती काय अपेक्षा. घरातल्यांची काळजी घ्या, शास्त्रीय माहिती घ्या, अफवांना बळी पडू नका. छान रोजचे रुटीन बनवा, कुटुंबाला वेळ द्या, विनाकारण फक्त बातम्या पाहणे टाळा. पुरेशी झोप, शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार हि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची त्रिसुत्री लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचे कृतज्ञता भाव नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही सुरक्षित आहात कारण कोणीतरी आपल्यासारखाच हाडामांसाचा माणुस तुमच्यासाठी दिवसरात्र झटतो आहे याची जाणीव ठेवा. सकाळी उठल्यावर त्या सगळ्या अज्ञात कोरोना योध्याचे आभार माना.

     

   पुढील लेखात लवकरच भेटू. …. (क्रमशः )