जगणं थांबवलेली माणसे.

जगणं थांबवलेली माणसे.

“अरे काय महेश, काय चाललंय तुझे ? ज्या ट्रिपची आपण एव्हढी स्वप्न रंगवलेली, ती का कॅन्सल केलीस ? थांब रे बाबा ऑफिसमध्ये जरा गडबड आहे, नंतर जाऊच की.”

“अगं संध्या, कधीतरी येत जा की कीटी पार्टीला. सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, छान वाटते. एवढं क्लिनिक जरा सेट होऊ दे, मग नक्की.”

“घेतलेस का नवीन कपडे अम्या ? की तुझे नेहमीसारखेच जरा वजन कमी करतो मग घेतोच की.”

“काय रे श्रेयांश घेतलास का कॅमेरा ? की परत दिवाळीच्या बोनस ची वाट पाहतो आहेस तुझा छंद जोपासायला.”

“प्रिया तुझा तो फेवरीट ड्रेस वापरला की नाही परत ? की कॉलेज सारखेच परफेक्ट ओकेजन ची वाट पाहते आहेस ?”

“किरण भाऊ किती वेळा सांगितले घरी वेळ देत जा. एव्हढे हॉस्पिटल सुरळीत चालू होऊ दे रे मग नक्की.”

यापैकी किंवा अश्यासारख्या गोष्टींमध्ये स्वतः आहात का ? पहा बरे एकदा. असणारच ! एक तरी अशी गोष्ट, जी खूप करण्याची इच्छा आहे. अगदी छोटेखानी स्वप्न म्हणा हवे तर त्या गोष्टीला. पण आयुष्याच्या घाई गर्दीत काहीना काही कारणांमुळे मागे पडते आहे. मग काही दिवसांनी ती मागे पडल्याची हुरहूर सुद्धा मागे पडते आणि आपले रोजचे यंत्रवत जीवन चालूच राहते. पण खरे सांगू का हे असेच चालू राहणार, ती परफेक्ट वेळ, ओकेजन किंवा व्यक्ती अशीच काहीतरी हूल देत राहणार.

सगळ्यात महत्वाचे, लक्षात घेण्यासारखे ते असे की आजकाल आपल्याला मृत्यूची सुद्धा भीती वाटेनाशी झालीये. विचित्र वाटले ना ऐकायला ? तरीसुद्धा हेच सत्य आहे. आपल्या तिशी चाळिशीतल्या मित्राच्या अचानक जाण्याने आपण खूप हादरतो. त्यावर मग बऱ्यापैकी अंगवळणी पडलेल्या चर्चा, प्रतिक्रिया आणि हो हळहळ व्यक्त करतो. आणि क्षणाचीही उसंत न घेता आपल्या रॅट रेस मध्ये जोरात पळायला लागतो.खरंच आताशी कुठे मला रॅट रेस चा खरा अर्थ कळतोय. बऱ्याच गोष्टी माहिती असणे आणि त्याची अनुभूती (अनुभव) येणे या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत.

सगळ्याच गोष्टी एकाच आयुष्यात हाती नाही लागणार, एव्हढे अवाढव्य आपले आयुष्य आणि त्यातल्या त्यात आपल्या अपेक्षा नक्कीच झाल्या आहेत. त्या मिळणार नाहीत याची पण जाणीव बऱ्याच जणांना आहे.
गोंधळ उडतोय तो प्राधान्यक्रमामध्ये.(Priorities) याचे कारण माझ्या मते आपण एक चूक करतोय. आपण प्राधान्यक्रम सुद्धा ठरवतो पण तो क्रम सुद्धा प्राधान्याने बदलायचा असतो (Priorities are dynamic) हे मात्र विसरतो किंवा तो तसा बदलायचा असतो हेच आपल्याला कळत नाही. मग आयुष्याच्या काही महत्वाच्या टप्प्यावर ठरवलेल्या गोष्टी आपण कसोशीने पाळायचा प्रयत्न करतो, पण त्यांचा क्रम आता बदललाय हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि गोंधळाला सुरुवात होते.

उदा. डॉक्टर म्हणून सुरुवातीला बारा तास काम करणे चूकच, तरी समाजमान्य म्हणून मान्य करूया. पण हाच नियम लग्नानंतर किंवा छानसे बाळ झाल्यानंतर बदलायचा असतो हेच बऱ्याच जणांना कळत नाही. डॉक्टरांचे उदाहरण कारण त्याची अनुभूती आलीये म्हणून, बाकी काही नाही.

हे आयुष्यातील सगळ्याच गोष्टींमध्ये, सगळ्याच लोकांमध्ये आणि आयुष्याचा कुठल्यातरी टप्प्यावर लागू पडते. आपण आपले प्राधान्यक्रम ठरवायचे गरजेनुसार ते बदलायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे त्यानुसार यथेच्छ जगायचे. असे जगाल तर वेळेआधीच जगणं थांबवण्याची गरज पडणार नाही. या नवीन वाटचालीच्या तुम्हांला शुभेच्छा.

#मुकाम्हणे

डॉ. मुक्तेश दौंड
निम्स हॉस्पिटल, नाशिक.