विचारवंतांना आवाहन

विचारवंतांना आवाहन

    आजकाल चौका चौकातील अड्ड्यावर कुत्र्यांच्या मीटिंग भरत आहेत. होर्डिंग वर नेहमी दिसणारे प्रेरणास्त्रोत, अप्पा, दादा, पप्पू, भाऊ, चिंट्या हे या अडचणीच्या वेळेस कुठे गेले असावेत ? असा एकंदरीत त्यांचा चर्चेचा सुर असावा. म्हणजे त्यांनी घरातच बसावे अशीच माझीही इच्छा. कदाचित बंद असल्यामुळे त्यांची 'द्रव्य' रुपी प्रेरणा कमी पडली असावी हा माझा निष्कर्ष, द्रव्य रुपीचे सगळे अर्थ काढावेत.

    दादागिरी करून वर्गणी मागणारे, देवापुढे रात्रीच्या वेळी पत्ते खेळणारे, आणि काम करणाऱ्याला हमखास काम कसे करावे याचे सल्ले देण्याचे यांचे कौशल्य आज या संकटाच्या काळात काही उपयोगाला आले नाही. भविष्यात देखील येऊ नये हीच ती इच्छा.

    अशी एखादी पोस्ट लिहिल्यावर त्या धर्माबद्दल काही बोलत नाहीस. आधीच्या सरकारने काही केले नाही. असे बोलणारे लोक त्यांची जागा भरून काढत आहेत. अरे बाबांनो ते कुत्रे तरी लवकर शिकतात रे. पण आम्ही नको तिथे अडवणूक करून, "आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे पहायचे वाकून" अशा मानसीकते मधून कधी बाहेर येणार आहोत.

    स्वतः कडे आणि आपल्या वागण्याकडे तटस्थपणाने पाहून त्यातील उणिवा दुर करण्यासाठी प्रयत्न करूया. स्वतः मध्ये आणि आपल्या गृहितकांमध्ये निरंतर सुधारणा करत राहणे यालाच विज्ञान म्हणतात. आणि असे कष्टातून मिळवलेले ज्ञान दुसऱ्याला समजेल अशा भाषेत मांडत राहणे याला आपण विज्ञानाची सेवा म्हणूया हवे तर.संपूर्ण मानवजातीला अशा विज्ञानाच्या सेवेकऱ्यांची गरज आहे.

    वर उल्लेखिलेल्या भारतातील रिकामटेकडे तारुण्य जर आपण व्यवस्थित मार्गाला लावू शकलो नाही तर ती आपलीच चूक असेल. सध्याच्या काळात जश्या धार्मिक मालिका सुरू केल्यात तश्या अनेक उत्तमोत्तम विज्ञानाधिष्टीत मालिका सुरू कराव्यात (हवेतर लोकांना कळतील त्या भाषेत त्या डब केल्या जाव्यात) जेणेकरून आपण या लॉक डाउनचा चांगला वापर केला असे म्हणता येईल.

     नाहीतर येणारा पुढील काळ हा इतका अनिश्चीततेचा असणार आहे की, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा वाढीस लागण्याचा धोका आहे. सर्व नुकसान भरून काढता येते पण बौद्धिक दिवाळखोरी भरून काढायला पिढ्या जाव्या लागतात. त्यामुळे माझी सर्व विज्ञानाच्या सेवेकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमचे शिक्षण कमीत कमी आपल्या मातृभाषेत लोकांना कळेल अशा शब्दांत मांडायला सुरुवात करा. ज्ञान दिल्याने वाढते, त्यामुळे ही विज्ञानाची सेवा तुम्हांला भरभरून परतावा देईल. आणि विज्ञानाधिष्टीत समाज उभारण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा राहील.

    दुसऱ्यांना नावे ठेवण्यापेक्षा आणि फक्त बातम्या पाहून टाईमपास करण्यापेक्षा ही विज्ञानाची सेवा करा ही विनंती. जगातले सर्वोत्तम ज्ञान जर आपल्या मातृभाषेत उपलब्ध व्हायला लागले तर, ती रिकामटेकडी टाळकी काहीतरी विधायक कार्याला नक्की लागतील असा मला पुर्ण विश्वास आहे.

केल्याने लेखाटन ।
बदलेल देशमन ।।
मुंगीच्या पावलाने करूया सुरुवात ।
होईल विज्ञानाच्या क्रांतीची प्रभात ।।
मुका म्हणे, आपुला वाटा आपुनच उचलावा।
दुसऱ्यांस बोल लावणे व्यर्थहीन ।।