मिडब्रेन एक्टीवेशन – एक आधुनिक भोंदूगिरी

मिडब्रेन एक्टीवेशन – एक आधुनिक भोंदूगिरी

मिडब्रेन एक्टीवेशन हे आधुनिक बुवाबाजीचे खास उदाहरण! असली भोंदूगिरी तथाकथित धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा घातक होत चालली आहे. यांत सामान्य नागरीकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्याला वैज्ञानिक व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार हवा तेवढा विरोध करतांना दिसत नाहीत.
एकीकडे अनेक धार्मिक श्रद्धा लोकांना जीवनाची विधायक दिशा देतांना दिसतात तर दुसरीकडे असले विज्ञानाचा बुरखा घातलेल्या ह्या गैरव्यापारी वृत्ती समाजाची दिशाभूल करतांना दिसतात. (गैरव्यापारी यासाठी की व्यापारी हे समाजाची खरी गरज पुरी करतात तर हे खोटे बोलून पैसा उकळतात.)
मिडब्रेन एक्टीवेशनमुळे मुलांची स्मरणशक्ती वगैरे वाढते ह्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामागे कुठलेही दर्जेदार संशोधन नाही.
मुलांना डोळे बंद करून वाचता येते असे सांगण्यापर्यंत ह्या गैरव्यापारी मंडळींची मजल गेली आहे.
आपल्यापैकी अनेकांना समाजसेवा करण्याची इच्छा असते. अशांनी ह्या भोंदूगिरीविरूद्ध बोलले वा लिहिले तरी मोठी समाजसेवा घडेल.
दि हिंदू या वृत्तपत्रात काही दिवसांपूर्वी यावर बातमी आली होती. नायक नावाच्या बेंगलूरूच्या एका माणसाने मिडब्रेन एक्टीवेशनच्या जाहिरातींमधील बाबींना आव्हान देत पाच लाखाची पैंज लावली. मिडब्रेन एक्टीवेशन करणाऱ्यांने ती स्वीकारलीही! पण जसजसे ते सिद्ध करायचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे बहाणेबाजी करू लागले व शेवटी परिक्षेच्या दिवशी आलाच नाही. कारण म्हणे ‘आव्हान देणारा बुद्धिप्रामाण्यवादी असल्याने वातावरण बिघडेल व हवे ते परिणाम येणार नाहीत.’
मिडब्रेन एक्टीवेशन हे अनेक बुवाबाजीपेक्षा घातक अशासाठी की ते फसवे विज्ञान आहे. विज्ञानाचा बुरखा आहे पण वैज्ञानिक पद्धतीचा पूर्ण अभाव आहे. वैज्ञानिक परिभाषेतील अवघड शब्द वापरले जातात पण वैज्ञानिक तत्त्वांचा अभाव आहे. भरपूर खोट्या बढाया आहेत. शास्त्रीय तपासण्यांना सामोरे जाण्याचे धैर्य नाही. आधी वैज्ञानिक म्हणायचे आणि लोकांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली की देवावर विश्वास पाहिजे असे सांगायचे.
पुण्यामुंबईत हे लोकसंख्येच्या प्रमाणात अल्प दिसतात कारण तेथील नागरीक काहीसे जागरूक आहेत. मात्र लहान गावात ह्या मंडळींचा गैरव्यापार जोरात चालतो.
समाजातील धुरीणांनी ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ ह्या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे ह्या मंडळींची गावातूनच गच्छंती करायला हवी. नेते मंडळींचे सामान्यांचे शोषण थांबवणे हे कर्तव्य आहे.
Dermatoglyphics हे शास्त्रीय नाव घेऊन असलीच फसवणूक केली जात आहे. तेही मुलांच्या पालकांच्या अगतिकतेचा व भोळेपणाचा फायदा घेऊन शोषण करत असतात.
शेवटी, कुण्याही सायक्याट्रीस्ट वा न्युरॉलॉजिस्टचा मुलगा मिडब्रेन एक्टीवेशन करून घेत नाही की dermatoglyphicsच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडत नाही.
—डॉ. धनंजय चव्हाण, पुणे
MD (Psychiatry), Fellow in Geriatric Mental Health.