गरज सरो वैद्य उरो

गरज सरो वैद्य उरो

    (कोणी कितीही उलट सुलट बोलले तरी डॉक्टर त्यांचे काम प्रामाणिक पणे करत होते, करत आहेत आणि करत राहतील.)

    आजकाल कोरोना दरम्यान आणि जेव्हा जेव्हा डॉक्टरांवर संकट आले आहे, तेव्हा तेव्हा काही लोक त्यांच्या बाजुने उभी राहण्यापेक्षा, त्यांची बाजु समजुन न घेता त्यांची माप काढण्यात धन्यता मानत आहेत. अशा सर्व पुण्यात्म्यांना स्मरून…..(सन्माननीय अपवाद सगळीकडे असतात. या संदर्भात तर फारच तुरळक आहेत उगाच चान्स दिलाय म्हणून स्वतः ला अपवादात मोजू नये.)

     ही डॉक्टरांची मापं काढणारी मंडळी कोण असतील बरं ? ज्यांची वयाची साठी, बायपास झाल्यामुळे पार झालेली. आयुष्याच्या शेवटी शेवटी वीस वीस वर्षांपासून औषधे खाऊन आयुष्य लांबवलेली लोकं. यात मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे विकार, मानसिक आजार, किडनीचे विकार असलेली आणि तुम्हांला माहिती असतील नसतील ते सगळे आजार असूनसुद्धा बऱ्यापैकी छान आयुष्य जगणारी माणसे.(ही औषधे खाल्ली नसती तर कदाचित त्या औषधांच्या फक्त साईड इफेक्ट वर अशा गप्पा मारणारी बरीच मंडळी आज हयात नसती. इफेक्ट आहे म्हणून साईड इफेक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचे या औषधांमुळे ही मंडळी आणखी पृथ्वी तलावर आहेत.) अडचणीची बाळंतपणे शस्त्रक्रियेच्या साहाय्याने करून स्वतःचा आणि बाळाचा जीव वाचवलेल्या आणि नंतर उगाच ऑपरेशन केले असे म्हणणाऱ्या नारीशक्ती ह्या सुद्धा यात आल्या. सगळ्यात कहर तर व्यसनं करून शरीराचे वाटोळे करून घेऊन त्याची पावती डॉक्टरांच्या नावाने फाडणारी तरुण मंडळींची नवजमात पण यातच आली. म्हणजे डॉक्टरांची मदत घेतली नाही असा माणुस काही म्हंटला तरी एकवेळ चालेल पण जेव्हा केवळ वेळेत उपचार झाल्यामुळे आज जिवंत असणारी मंडळी सुद्धा डॉक्टरांविषयी आणि उपचार पद्धतींविषयी उलट सुलट बोलतात तेव्हा हे गैरसमज दूर होणे खुप आवश्यक आहे. मातूर उपचार सुरू केलेले. हे सगळे सांगायचे कारण या चालीरीती कशा तयार झाल्या याची तुम्हांला माहिती व्हावी हा उद्देश.

     याच्या उलट डॉक्टरांना भेटायला आल्यावर, आम्ही ते चाळीशी पार झाल्यावर अमुक धमुक हजार खर्च करून सगळ्या तपासण्या करून घेतल्या, असे अभिमानाने सांगणारी माणसेही आजकाल उदयाला आलेली आहेत. लक्षात घ्या डॉक्टरांनी सांगितले नसतानाही ह्या तपासण्या केल्या जातात. यात भर घातली आहे ते ग्राहक मंचाने डॉक्टर्स विरुद्ध दिलेल्या निर्णयांमुळे, ज्यात काही टेस्ट केल्या नाहीत म्हणून डॉक्टरांना चुकीचे ठरवण्यात आलेले आहे. फक्त रक्ताच्या चाचणी संदर्भांत देखील असे दोन टोकाच्या विचारधारा असणाऱ्या देशातील डॉक्टर एवढ्या गोंधळात देखील कसे काम करत असतील, याचाही विचार व्हायला हवा.(आधी या रक्त तपासणीच्या सुविधा नव्हत्या त्यामुळे बरेच आजार वेळेत लक्षात न आल्यामुळे बरीच माणसे अचानक मृत्युमुखी पडायची, आता या तपासण्यांमुळे बरेच आजार लवकर पकडले जातात आणि बरेच लोक बोनस आयुष्य जगतात.)

     या मिळालेल्या बऱ्याच बोनस वेळेचा म्हणजेच बोनस आयुष्याचा उपयोग काहीतरी विधायक कामात खर्च करण्या ऐवजी बऱ्याच वेळा आरोग्य क्षेत्र आणि डॉक्टर्स हे कसे लोकांना विनाकारण आजारी पाडतात अशा विषयावर बऱ्याच वेळा ही मंडळी खर्च करतात. आणि असे बऱ्याच वेळा करून जेव्हा डॉक्टरांच्या कर्तृत्वावर शंका घेतात, तेव्हा मला या लोकांचे बऱ्याच वेळा बरेच भारी कौतुक वाटते.

    फक्त साईड इफेक्ट, साईड इफेक्ट एवढयाच नावाने जे लोक मॉडर्न मेडिसिन ला ओळखतात, त्यांनी खालील मुद्दे सुद्धा लक्षात घ्यावेत. जिथे भारतीयांचे सरासरी आयुष्यमान 43 वर्ष होते ते आता 67 पेक्षा जास्त झाले आहे. माता मृत्युदर, बाल मृत्युदर, वयाच्या पाच वर्षाखालील मृत्युदर आणि आजारी पडण्याचे प्रमाण, लसीकरण, Quality of life, ह्याची आकडेवारी कधीतरी स्वतः चेक करून पहा. पोलिओ, देवी, नारू आणि धनुर्वात जे लोकांना किडा मुंगीसारखे मारायचे ते आता हद्दपार झाले आहेत. एड्स, मलेरिया, क्षयरोग, मधुमेह आणि रक्तदाब ह्या आरोग्याच्या नव्या शत्रूंशी आता डॉक्टर लोक दोन हात करत आहेत. यातही आपल्या लोकांचे सहकार्य इतके वाखाणण्यासारखे आहे की त्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. दिलेली औषधे सुद्धा लोकांच्या सांगण्यावरून आणि स्वतःच्या मनानुसार आपल्या लोकांनी बदलल्यामुळे आता प्रतिजैविके सुद्धा काम करेनाशी झाली आहेत या गोष्टीचे गांभीर्य सुद्धा डॉक्टरच जाणो. (AntiBiotic Resistance)

     ह्या सगळ्या वरील गोष्टींमध्ये झालेल्या सुधारणांमुळे आता आजारांचे प्रकार बदलले आहेत. आजकाल होणाऱ्या मृत्यूंमध्ये असंसर्गजन्य आजरांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 60 % एवढे आहे. या असंसर्गजन्य (Non Communicable Diseases) आजारांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आणि श्वसनसंस्थेचे आजार यांच्यामुळेच 80 % मृत्यू होत आहेत. आणि लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हे असंसर्गजन्य आजार होण्यामध्ये तंबाखु, दारू, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव ही सगळ्यात महत्वाची कारणे आहेत. हे काही मी नवीन सांगतोय का ? अजिबात नाही, पण हे सगळं उलटं करायचं आणि तरी आपण धडधाकट राहू असा विचार करायचा. हे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची आणि तरीही फक्त डॉक्टरांनी टाके घातले म्हणून बोंबलत सुटायचे असे आहे. सुधरा लोक हो स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः च घ्या, आणि तसेच स्वतः च्या आजारपणाची जबाबदारी सुद्धा स्वतः च घ्या.

    जसे लोक तसेच सरकार, आपण GDP च्या फक्त 1.3% आरोग्यावर खर्च करतोय. हे प्रमाण जगातील खूप खालच्या पातळीवर आहे याची कृपया नोंद घ्यावी. या सरकारी अनास्थेमुळे 85.6% लोकांना स्वतःच्या खिशातून पैसा आरोग्यासाठी खर्च करावा लागतो, हे ही अनेक कारणांपैकी एक गरीबी वाढण्याचे कारण आहे. (यात डॉक्टरांचा काहीही रोल नाही. लोक म्हणतील मग प्रायव्हेट डॉक्टरांनी फी कमी घ्यावी, सरकार या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही उलट नवनवीन नियम तयार करून त्यांची अडवणूकच करते. तरीही बाकी कुठल्याही ठिकाणी फी नियमन न करणारे सरकार डॉक्टरांना फीची बंधने घालते, ही बंधने इतकी काल विसंगत असतात की जो कोणी ही बनवतो तो मागील 25 वर्षात त्यांच्या वातानुकूलित ऑफिस च्य बाहेर आलेला नाही हे अगदी स्पष्ट कळते. Huge gap between policy makers view towords society and Health sector and Ground reality of these two entities, It must be bridged. ) हे बदलावे असे वाटत असेल तर सगळी आरोग्य व्यवस्था बदलणे गरजेचे आहे. फक्त डॉक्टरांना दोष देणे आणि असे हात वर करणे किती दिवस चालू ठेवणार आहात. असे असुनही भारतीय डॉक्टर दर्जाच्या बाबतीत जागतिक दर्जाचे काम करत आहेत, ही खरंच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण आपल्या लोकांना त्याची किंमत अजुनही कळालेली नाही, असो वेळ हे याच्यावरील सर्वोत्तम औषध आहे. लोकांना आणि पॉलिसी बनवणाऱ्यांना ती लवकर कळो एवढीच इच्छा.

    कधीतरी या विषयाचे गांभीर्य समजुन घ्या. 195 देशांमध्ये आपण 154 नंबरला का आहोत ? सरकारला, नियम कर्त्यांना आणि प्रशासनाला देखील असे प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे. हे झाले तर ती नक्कीच एक चांगली सुरुवात असेल आणि ती डॉक्टर आणि रुग्ण यांनी मिळून करायची आहे, एकमेकांना दोष देऊन नाही. हे डॉक्टर पेशंटचे दिवसेंदिवस बिघडत जाणारे नाते दोघांनाही त्रासदायक आहे, आणि लक्षात ठेवा दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असतोच असतो. आपल्याला अपेक्षित व्यवस्थेमध्ये रोग बरे करण्यापेक्षा रोग टाळणे, आरोग्याची जनजागृती आणि उपलब्ध सुविधांचा दर्जा वाढवण्यावर भर द्यायचा आहे आणि हे शक्य होईल जेव्हा सरकार आरोग्याला प्राधान्य देईल आणि आरोग्यावरही खर्च करेल. ज्यावेळेस आर्थिक मदत वाढेल, मनुष्यबळ, साधन सामुग्री आणि पुरवठा याचा दर्जा हळू हळू सुधारेल. सध्याची आपली आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती पहाल तर बरेच कटू वास्तव तुम्हांला कळेल. डॉक्टर हा हकनाक बळीचा बकरा बनवला जातोय यात काहीच शंका नाहीये आणि ही गोष्ट उशिराने का होईना लोकांना कळते आहे ही जमेची बाजू.

    पण असे शास्त्रीय बोलून चालत नाही, आताही पहा ना, हे वाचताना किती बोर झालंय ना ?आपल्याकडे लोकांना विज्ञानाची ऍलर्जी आहे, फॅक्ट पेक्षा भावनिक आवाहन खुप असते लोकांचे आणि हे असे आवाहन वाऱ्यासारखे पसरते हे ते बनवणाऱ्यांना पक्के ठाऊक असते. उदा. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल मोकळी आहेत, म्हणजे इतरवेळी डॉक्टर मुद्दाम लोकांना आजारी ठरवतात आणि ऑपरेशन करतात किंवा ऍडमिट करून विनाकारण तपासण्या करतात. आजकाल डॉक्टर कोरोनामध्ये व्यस्त असल्यामुळे लोकांचे मरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, कशावरून तर म्हणे स्मशानात येणाऱ्या मृतदेहांची संख्या कमी झाली आहे. आधीसुद्धा जेव्हा जेव्हा डॉक्टरांनी संप केले तेव्हा मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. आता ती हृदय विकाराने आणि स्ट्रोकने मरणारी माणसे कुठे गेली ? असे भावनिक आवाहन केले की भली भली स्वतः ला विचारवंत समजणारी मंडळी या भावनिक लाटेत वाहत जातात. पण जे काही दावे केले गेले आहेत त्यांची सत्यता पाहण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. मी आकडेवारी नाही देणार, तुम्हीच मागील काही वर्षांची लोकांची मृत्यूची आकडेवारी आणि या वर्षीची संबंधित आकडेवारी याची तुलना करा आणि हो तटस्थपणे. मग वरील विधानांमधील फोलपणा तुम्हांला लक्षात येईल, पण असे कोण करेल, इथेच तर गोची आहे आपल्या लोकांची.

    आणखी एक भावनिक आवाहनाचे उदाहरण देतो. वयोवृद्ध मंडळींचे नेहमीचे आणि अभिमानाचे वाक्य असते, तरुणपणी एकदाही आजारी पडलो नाही, गोळी नाही की इंजेक्शन नाही. स्त्रियांचे असते आजकालच्या पोरी लयी नाजुक आहेत, बाळंतपण आम्ही कशी केली आणि या कशा करतात. भारी वाटते की नाही असे ऐकून तथ्यही वाटते यामध्ये. ती मंडळी खरंच बोलत असतात पण त्यामागचे विज्ञान मी तुम्हांला सांगतो. आपल्या आयुष्यातील आरोग्यविषयीची प्रत्येक गोष्ट ही आपली जनुके ठरवत असतात (Genetics). ज्या अर्थी ही मंडळी इतके दिवस आरोग्यपूर्ण राहिली म्हणजे त्यांचे जेनेटिक्स खुप चांगले आहे. ज्यांचे शरीरात काहीतरी दोष होता ती मंडळी आधीच मृत्युमुखी पडलेली आहेत, कारणे भले प्रत्येकाची वेगळी वेगळी असतील. असा विचार केला तर पटते ना, सशक्त तेवढीच टिकली आहेत, बाकीच्या मंडळीची आधीच गळती झालेली आहे. यालाच डार्विन ने "लॉ ऑफ नँच्युरल सिलेक्शन" म्हंटले आहे. सशक्त टिकतात आणि आपली पिढी पुढे वाढवतात बाकीचे अशक्त आधीच नाहीसे होतात. असा विचार कधीतरी करून पहा मग त्यांच्या निरोगीपणाचे क्रेडिट त्यांनाच मिळेल.

    थांबतो, खूप काही आहे बोलायला, नंतर कधी. खरेतर मी याचे नाव "गरज सरो वैद्य मरो" असे देणार होतो. पण आता मला डॉक्टरांविषयी वाईट बोलणाऱ्या लोकांचा राग नाही येत तर त्यांच्या विचार प्रक्रियेची उत्सुकता वाटते. त्यांच्या आरोग्याविषयी असणाऱ्या गैरसमजुतींविषयी वाईट वाटते. त्यामुळेच वैद्य जर मरून गेला तर यांचे कसे होणार. म्हणून "गरज सरो वैद्य उरो" असे आशावादी नाव दिले आहे. आरोग्याविषयी आणि त्यातील घटकांविषयी (Genetics,Heredity, Pharmacogenetic, Individual Pharmacotherapy, Molecular Genetics, Imaging Techniques and many more) इतकी जनजागृती होवो की कुणीही आजारी न पडो, पडले तरी आपली सरकारी व्यवस्था इतकी छान असो की त्याचा उपचार विनाविलंभ आणि जागतिक दर्जाचा होवो. आणि आम्ही डॉक्टर लोक हे सगळे पाहायला जिवंत राहो, हीच ती इच्छा. कारण स्वप्नपूर्ती जिवंतपणे झाली तर तिची मजा काही औरच असते नाही का ?