आत्महत्या रोखूया

आत्महत्या रोखूया

डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ, निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक.

सध्याच्या काळात दोनच गोष्टी मिडियामध्ये जास्त प्रमाणात दाखवल्या जात आहेत. त्या म्हणजे करोना (Corona) आणि आत्महत्या! (Suicide) बऱ्याच घरांत पालकांनी तेच-तेच पाहिल्यामुळे लहान मुलेदेखील आता विचारतात, ‘बाबा, आत्महत्या म्हणजे काय हो ?’ इतका हा शब्द रुळला आहे, पण माहिती असणे आणि समजणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

आत्महत्या हा विषय लोकांना किती समजला आहे हा मोठा प्रश्न आहे. मिडिया या गोष्टींचे अतिरंजित आणि बऱ्याचवेळा चुकीचे सादरीकरण करतो आणि आपण सगळे ते पाहून लहान मुलांसारखे आणखी गोंधळून जातो. आज 10 सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ (World Suicide Prevention Day) आहे. करोनाने आरोग्याची आणि आर्थिक व्यवस्थेची घडी मोडली आहे. अशा अडचणीच्या काळात आत्महत्येविषयी जनजागृती आणखी महत्वाची ठरते.

दर 40 सेकंदांना एक व्यक्ती आत्महत्या करते. 15 ते 29 वर्षे वयोगटातील मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे एक प्रमुख कारण आहे (लॅन्सेट २०१२). दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो आणि आत्महत्येचा दर 2018 च्या तुलनेत 3.4 टक्क्यांनी वाढला आहे एनसीआरबी २०१९ डेटा). यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे (4 विद्यार्थी दर दिवसाला).

जागतिक पातळीवर स्त्रियांमधील 33 टक्के आणि पुरुषांमधील 25 टक्के आत्महत्या भारतात (India) होतात. 1990 नंतर यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचारांचा यात खूप मोठा वाटा आहे. ही आकडेवारी आहे नोंद झालेल्या घटनांची आहेत. नोंद न होणारी आकडेवारी आपल्याला माहिती नाही. यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारे नाहीत. ते याच्या कितीतरी पटीने जास्त असतील. एका आत्महत्येमागे सरासरी 135 लोकांना खूप दुःख होते हे कृपया समजून घेणे आवश्यक आहे.

आत्महत्येला प्रवृत्त करणारी कारणे

 • आर्थिक अडचणी. कर्जाची परतफेड करता न येणे. बेरोजगारी. वाढलेला आयुष्याचा वेग.
 • जवळच्या व्यक्तीचे अचानक जाणे. नातेसंबंधातील तणाव. जबरदस्तीची लग्ने आणि त्यामुळे झालेला गुंता. घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे एकटे राहावे लागणे. प्रेमातील अपयश. बदललेली परंतु न पचलेली नैतिक मूल्ये.
 • करोनासारखा वैश्विक आजार, भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती. त्यांनी दाखवून दिलेला आपल्या व्यवस्थेचा तोकडेपणा.
 • परीक्षांमधील अपयश. पालकांच्या आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करता न येणे. विस्कळीत बालक-पालक नाते.
 • स्वतःच्या स्वतःकडून असणाऱ्या अतिरेकी आणि अवास्तव अपेक्षा.
 • वाढते शहरीकरण, त्याबरोबरचे स्थलांतर यामुळे वाढलेली अस्वछता, प्रदूषण, गर्दी, भुकेचे प्रश्न, झोपडपट्टी, संसर्गजन्य आजारांचा धोका या अडचणींमुळे उडालेला आरोग्य आणि इतर व्यवस्थांचा बोजवारा.
 • शिक्षणाचा अभाव, खऱ्या आयुष्यातील रोल मॉडेल्सचा अभाव किंवा चुकीची रोल मॉडेल्स.
 • हिंसाचाराच्या घटना. संरक्षक आणि न्यायव्यवस्थेवरील उडालेला विश्वास.
 • स्त्रियांवरील घरातील, कामाच्या ठिकाणावरील दुजाभाव. चित्रपट आणि जाहिरातींमधील त्यांचे अवमूल्यन.
 • भ्रष्टाचार, काळा बाजार, जात-धर्म-प्रांत-भाषा यावरून होणारी भांडणे. मूलभूत अधिकारांचे हनन. मोडलेले सामाजिक सौहार्दाचे वातावरण.

या सर्व आणि इतरही बऱ्याच गोष्टी व घटनांमुळे सध्याच्या काळात ताणतणावात झालेली प्रचंड वाढ सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळे इथे मांडण्याचे कारण म्हणजे ‘सर्व आत्महत्या करणारे मानसिक आजाराचे रुग्ण नसतात आणि सर्व मानसिक आजार असणारे आत्महत्या करत नाहीत.’

वरील कारणे आणि प्रत्येकाची काही वैयक्तिक तत्कालिक कारणे यामुळे ती व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होते. फक्त तत्कालिक करणांकडे पाहून आपण त्या व्यक्तीला दोष दिला तर ते निश्चितच चुकीचे आहे.

आत्महत्या करणारी व्यक्ती प्रचंड वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड तणावात असते आणि त्यातून ती असे टोकाचे पाऊल उचलते एवढे जरी लक्षात आले तरी खूप बरे आहे. कारण आपल्याकडे आत्महत्या करण्याचा संबध पळपुटेपणा किंवा मनाचा कमकुवतपणा याच्याशी जोडला जातो. जे खूप चुकीचे आहे.

आपण काय करू शकतो? आयुष्यात प्रत्येक जण ज्याचे-त्याचे युद्ध खेळत असतो. कधी-कधी अगदी जवळच्या व्यक्तीलासुद्धा याची कल्पना नसते. कधी-कधी हे युद्ध अगदीच त्रासवणारे होत जाते आणि मग आत्महत्येचे विचार डोक्यात येऊ शकतात हे समजून घ्या.

समाजातील पुढील काही गैरसमज दूर करण्यासाठी मदत करा. वॉर्निंग लक्षणे माहिती असू द्या. तसे झाले तर काय करायचे याची माहिती घ्या.

काही प्रमुख गैरसमज पुढीलप्रमाणे

1) गैरसमज : ज्याने आत्महत्या केली आहे त्याने कोणाकडेच मदत मागितली नाही.

वस्तुस्थिती : आत्महत्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या जवळच्या लोकांकडे ही भावना व्यक्त केलेली असते. सरासरी मृत्यूपूर्वी 6 महिन्यांपासून त्याने ही कल्पना दिलेली असते.

2) गैरसमज: एखाद्याने मरायचे ठरवलेच आहे तर आपण काय करणार.

वस्तुस्थिती : कोणी कितीही ठरवलेले असले तरी मृत्यूविषयी त्यांची नेहमी द्विधा मनस्थिती असते. अगदी शेवटपर्यंत हा गोंधळ त्यांच्या डोक्यात असतो. त्यांना मृत्यू नको असतो, पण त्रासातून सुटका हवी असते. आत्महत्येचा विचार अधून-मधून त्यांच्यावर हावी होत असतो. त्यामुळे आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो.

3) गैरसमज : आत्महत्येविषयी बोलणे म्हणजे त्यांना आत्महत्येची आयडिया देण्यासारखे आहे.

वस्तुस्थिती : वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात हे विचार येतच असतात. उलट आपण याविषयी विचारणे हे त्यांच्यासाठी दिलासा देणारे असते आणि सगळ्यात महत्वाचे यातून संवाद सुरू होतो.

4) गैरसमज : आत्महत्येविषयी बोलणारे लोक तसे करत नाहीत.

वस्तुस्थिती : जवळ-जवळ आत्महत्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीने ती तसे करणार आहे याची कल्पना दिलेली असते. त्यामुळे गर्जणारे बरसत नसतात ही म्हण कृपया इथे वापरू नका.

5) गैरसमज : जो आत्महत्येचा प्रयत्न करतो तो वेडा असतो किंवा त्याला काहीतरी मानसिक आजार असतो.

वस्तुस्थिती : खूप लोकांना कुठलाही मानसिक आजार नसतानासुद्धा ती मंडळी वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करू शकतात, पण हेही लक्षात घ्या की, मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण नक्कीच जास्त असते.

आत्महत्येची लक्षणे

 • प्रत्येक आत्महत्येविषयीच्या चर्चेला गांभीर्याने घ्या. हे फक्त वॉर्निंग लक्षण नाही तर मदतीची हाक असते.
 • आत्महत्येचा विचार करणे आणि त्याविषयी माहिती गोळा करणे.
 • नेहमी मृत्यूविषयीच चर्चा करणे.
 • भविष्याबद्दल निराशाजनक मन:स्थिती असणे.
 • स्वतःचा तिरस्कार करणे.
 • सारवासारव सुरू करणे, उदा. आर्थिक व्यवहार मार्गी लावणे. बऱ्याच दिवसांची पेंडिंग कामे करून टाकणे.
 • एकलकोंडे होत जाणे.
 • स्वतःला त्रास होईल अशा गोष्टी करणे. उदा. काही लोक खूप व्यसनाच्या आहारी जातात.
 • खूप दुःखी असणारी व्यक्ती अचानक शांत होते. कधी-कधी आनंदी होते. त्यांचा निर्णय पक्का होत गेल्यामुळे मनातले भावनिक वादळ शांत झालेले असते.

अशी व्यक्ती आपल्या सभोवताली असेल तर आपण काय करू शकतो?

 • शांतपणे ऐका. सल्ले देऊ नका.
 • एकदम शॉक लागल्यासारखे तोंड करू नका. समजून घेण्याचा भाव असावा.
 • त्या चर्चेला गांभीर्याने घ्या. थट्टा नको, उगाच काहीतरी तोडके मोडके पर्याय देऊन, मी पाहून घेतो असे नको.
 • त्याच्या दुःखाबद्दल स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही सल्ला दिलाच पाहिजे, असा अविर्भाव नको.
 • अशा व्यक्तीला एकटे सोडू नका. बरोबर असा. चर्चा करा (जास्तीत जास्त ऐका).
 • मदतीची तयारी दाखवा आणि खरेच मदत करा.
 • त्याच्या आयुष्यात काही चांगले बदल सूचवा. योग्य वेळ पाहून.
 • संपर्कात रहा.
 • आत्महत्येला उपयोगी पडतील अशा गोष्टी त्या व्यक्तीपासून लपवून ठेवा.
 • गरज असेल तर मनोविकारतज्ञांचा सल्ला द्यायला हयगय करू नका.

आत्महत्येविरुद्धच्या या लढाईत समाजातील प्रत्येक जण त्यांच्या सभोवतालच्या सहकाऱ्याला मदत करू शकतो. याविषयी चर्चा करा, स्वतः शिका आणि इतरांनाही शिकवा. आत्महत्येची वॉर्निंग देणारी लक्षणे तुम्हांला माहिती असावीत. सगळ्यात महत्वाचे आपल्या जवळच्या माणसांचे बोलणे मन लावून ऐकणेसुद्धा एखाद्याचा जीव वाचवू शकते हे नेहमी लक्षात असूद्या.