गोळ्या संपल्या का रे ह्याच्या ?
सध्या निवडणूकीची धामधूम आहे. वेगवेगळे नेते आपल्या आर्थिक आणि बौद्धिक कुवतीनुसार स्टंटबाजी करत असतात. ते तर करणारच त्यांचे ते कामच आहे. पण एखादी स्टंटबाजी जास्तच वेगळी झाली की, मग खरा खेळ चालू होतो. खेळ, तो कोणता तर त्यांच्या त्या फालतू स्टंट बाजीला मानसिक आरोग्याशी आणि आजाराशी जोडण्याचा.
यात मोठे मोठे राजकीय कारकिर्द असणारे नेते सुद्धा मागे नाहीत. मग “याचे डोके सटकले आहे” यापासून सुरू होणारी यांची मुक्ताफळे, “याच्या गोळ्या (मनोविकारतज्ज्ञांनी दिलेल्या) संपल्या असतील.” इथपर्यंत किंवा कधीतरी यापेक्षाही खालच्या पातळीवर घसरतात. वैयक्तिक खालच्या पातळीवरील टीका, आजकाल नियम आहे, याबद्दल आक्षेप आहे पण मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक आजार आणि त्यांचे उपचार यावर केलेली टीका लोक सुद्धा एन्जॉय करतात.
मग असे शिकले सवरलेले (आपल्याकडे स्वतः च्या डोक्याने शिकण्यापेक्षा, नेत्याने काय बोलले किंवा वागले यातून जास्त शिकणारे चमत्कारिक लोक आहेत) लोक जेव्हा सोशल मीडिया वर असलीच चुकीची माहिती ओकत राहतात. तेव्हा मात्र नक्कीच याविषयी बोलावे आणि लिहावे लागेल असे वाटते.
मानसिक आजारांविषयी मनोविकारतज्ञ सोडून सगळ्याच लोकांमध्ये कमालीचे गुढतेचे वातावरण आहे. यातूनच मग जेव्हा काहीतरी विक्षिप्त गोष्टी घडतात, त्या सगळ्या मानसिक आजारांशी किंवा असा आजार असणाऱ्या व्यक्तींशी जोडण्यात येतात. मिडिया सुद्धा बातम्या चटपटीत करण्याच्या नादात बऱ्याच वेळा मानसिक आजारांचा आडोसा घेतो.
हे सगळे सांगायचे कारण, जेव्हा आपण असे वागत असतो तेव्हा मानसिक आजार असणारे किंवा त्यांचे घरातील व्यक्ती सुद्धा या गोष्टी जवळून पाहत आणि अनुभवत असतात. आपले असे टाईम पास साठी वापरलेली आणि कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेली वाक्ये त्यांच्या आधीच खचलेल्या मनोधैर्याची पार वाट लावत असतात. आणि यातूनच मानसिक आजारांविषयी असलेला कलंक (स्टिंगमा) वाढत असतो. मानसिक आजार लपवण्याची आणि ट्रीटमेंट नाकारण्याचे प्रकार हे सुद्धा वाढीस लागतात.
मनोविकारतज्ञ म्हणून आम्ही जेव्हा रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी याविषयी बोलतो, त्यांचेही हेच मत असते. लोक काय म्हणतील या भीतीने, आजार आहे हे माहिती असून देखील तो आजार अंगावर काढला जातो. हे एका सुशिक्षित समाजासाठी नक्कीच भूषणावह नाही.
खाली एक 71 हजार मेंबर असणाऱ्या ग्रुप चे उदाहरण घेऊ.
“घनघोर अपयशी माणूस वेड लागलं की कुठं ही कचरा उचलत फिरतं, असं मानसोपचारात मान्य
केलेलं लक्षण आहे.”
“म्हणजे या गृप मधे मतिमंद पण आहेत अशा काॅमेंट करणारे”
“कोणाला मानसोपचाराची गरज आहे ही ह्या पोस्ट वरून कळतंय”
“मानसोपचार वाला येडा झाल्यामुळें असे पोस्ट टाकतोय.”
“Who is your Doctor ~?”
“desh ka kachara saaf ho raha hai tow wed lagana bhi accha hai……?”
“You oneself is psycho.Donot have eticates and manners.”
“अनेक मोठ्या शहरात,कुठेही मानसिक स्वास्थ हरवलेले लोक्स असे कचरा शोधतांना आढळतात,आणि हे खरं आहे.”
“मग तर जपानचे सगळेच लोक मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायला पाहिजेत नाही का..”
“कोणत्या प्रकारच वेड आहे त्यावर ते अवलंबून आहे”
“पोस्ट करनारा माणूस खरोखरच मानसिक रुग्ण आहे अपयशाचे खचलेला.”
“गोळ्या संपल्या का रे ह्याच्या ?”
आणि आश्चर्य म्हणजे हा ग्रुप मानसशास्त्र ह्या नावाने आहे. जर मागील दोन वर्षांपासून मानसिक आरोग्या विषयी चर्चा करणाऱ्यांचे हे विचार असतील, तर सर्वसामान्य लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार.
तरी याचा आपण गांभीर्याने विचार कराल अशी अपेक्षा मी बाळगतो. कारण असा खराखुरा आजार असणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या घरच्यांना खरंच खूप मानसिक आधाराची गरज असते. आणि आपले असे वागणे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागणारे असते. मानसिक आरोग्य आणि आजार याची माहिती घ्या आणि नंतर व्यक्त व्हा, एवढीच विनंती.
#मुकाम्हणे
डॉ. मुक्तेश दौंड
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड,
नाशिक.