आणि त्याला भुते दिसली….
भूत…. लहानपणापासूनच सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय असतो, तसाच तो राहुलचाही होता. तो नेहमी त्याच्या गावातील भुतांच्या चर्चेमध्ये हिरीरीने भाग घ्यायचा, आणि ठणकावून सांगायचा भूत वगैरे काही नसते. राहूल एक पंचवीस वर्षाचा दुधाचा व्यवसाय करणारा, एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा. सगळे व्यवस्थित चाललेले आणि आता वय झाले म्हणून त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली. काही दिवसांनी मुलगी पसंत झाली आणि लवकरच त्याचे लग्न ठरले.
या धामधुमीत तो सतत नातेवाईकांनी वेढलेला होता. आणि हे लग्न ठरल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जी की अमावस्येची रात्र होती. अचानक राहूल गोंधळल्यासारखा वागायला लागला. जसा जसा रात्रीचा प्रहर पुढे पुढे जात होता तसा तो अधिक घाबरायला लागला, मधुनच भिंतीकडे पाही, थरथर कापे आणि भुतं आली आहेत मला घाबरवायला असे बोले. गोंधळलेला तो काहीतरी उलटपालट बोलायला लागला. घरच्यांना ओळखेना, एकटे आणि न समजणारे असे काहीतरी पुटपुटू लागला. त्याला दरदरून घाम फुटला होता, आनंदाच्या क्षणी हे असे अचानक काय झाले यामुळे घरची सगळी पाहुणी मंडळी घाबरून गेलेली. त्याला असे कधीच काही झाले नव्हते. ©Muktesh
शरीराने एकदम फीट असलेला मुलगा अचानक अमावस्येच्या रात्री असे करायला लागल्यामुळे, घरातल्या पाहुण्यांनी गावाकडे प्रचलित असलेला समज बोलून दाखविला. इतके दिवस भुताची चेष्टा केली ना आता त्याच्या आनंदाच्या क्षणी भूते त्यांची ताकद दाखवत आहेत.
त्याला लगेचच तेथील एका भुतं काढणाऱ्या बाबांकडे घेऊन गेले. त्यांनी त्यांचे नेहमीचे हातखंडे वापरून पाहिले पण भूत काही बधेना मग त्यांनीच मनोविकारतज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला. आणि रात्री दोन वाजता ते माझ्या हॉस्पिटलमध्ये आले. यादरम्यान तो सारखे हात जोडत होता, मला माफ करा असेही म्हणत होता, मधेच त्याने उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो तोल जाऊन पडला. कसेतरी गाडीमध्ये, त्याचे घाबरलेले नातेवाईक, त्याला मोठ्या अपेक्षेने घेऊन आलेले.
वडील आणि नातेवाईकांकडून प्राथमिक माहिती घेतली, कुठलाही जुना आजार नाही, कधी काही ईलाज नाही. त्यांना जेव्हढे माहिती होते ते त्यांनी सांगितले. राहूल ला तपासले त्याची हृदयाची गती शंभरच्या वर होती, रक्तदाब सुद्धा वाढलेला. बोलण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो गोंधळलेला होता, आपण कुठे आहोत, काय झाले आहे, याचे त्याला भानच नव्हते, मध्येच तो घरी असल्यासारखा आईला हाकमारी, किंवा गायीचं दूध काढायचे आहे, किती भाव येणार अश्या व्यवसायासंबंधी गोष्टी करे.
असे अचानक होण्याच्या कारणांमध्ये दारूचे व्यसन देखील येते. मी विचारले तर घरचे एकदम, “नाही हो डॉक्टर ! असे काय म्हणता !” ©Muktesh
पण त्या सात आठ जणांच्या घोळक्यातून त्याचा जिवलग मित्र गणेश आला आणि म्हणाला मला तुम्हांला काही सांगायचे आहे डॉक्टर. त्याच्याशी वेगळे बोलल्यानंतर कळले की राहूल गेल्या वर्षभरापासून दारू पितोय. त्याची गर्लफ्रेंड होती आणि तिच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले, तेव्हापासून ह्याने व्यसन चालू केले आणि ते वाढत गेले, मध्यंतरी व्यवसायात त्याला काहीतरी नुकसान झाले. तेव्हापासून तो रोज दारू घ्यायला लागला. संध्याकाळी आठ वाजता जेवण करून ह्याच्या घरचे लोक झोपले की आम्ही मित्र नऊ वाजल्यानंतर आमच्या ठरलेल्या जागेवर जायचो, प्यायचो आणि घरी यायचो. घरच्यांना शंका येऊ नये म्हणून ह्याने गोठ्या शेजारीच ह्याचा बिछाना लावलेला आहे. आणि आता लग्न ठरल्यापासून आणि एव्हढे पाहुणे घरी असल्याने ह्या तीन दिवसात त्याला काय आमच्या अड्ड्यावर यायला जमलेच नाही.
सगळ्या केसचा उलगडा झाला होता. गणेशच्या विनंतीला मान देऊन लगेच घरच्यांना काही सांगितले नाही. उद्या बोलूया असे सांगितले आणि राहूल चे योग्य दिशेने उपचार चालू केले. दोन इंजेक्शन नंतर तो छान झोपला, गरजेची औषधे आणि थायमिंन चे इंजेक्शन आवर्जुन दिले. तो झोपल्यामुळे वडील सोडून बाकीची पाहुणे मंडळी घरी गेली. आणि मी सुद्धा योग्य निदान होऊन उपचार चालू झाल्यामुळे छान झोपलो.
पुढील दोन तीन दिवसात त्याची प्रकृती छान सुधारली आणि तो घरी गेला, फक्त वडिलांना मी त्याच्या आजाराची कल्पना दिली होती. आठवड्याने जेव्हा तो हसत हसत भेटायला आला, तेव्हा त्याचे आईवडील सुद्धा खुश दिसत होते. या दिवसांत त्याने घरच्यांना सगळे खरे खरे सांगितले. त्याच्या व्यसनाविषयी, मैत्रिणीचे लग्न होणे, व्यवसायातील आर्थिक अडचणी. आणि घरच्यांनी त्याला छान समजुन घेतले होते (हे वडिलांना सुट्टी घेताना आवर्जून सांगितले होते.) ©Muktesh
तो पण ह्या व्यसनातून बाहेर पडण्यास तयार होता, ही यातली जमेची बाजू. राहूलला राहवले नाही आणि त्याने विचारलेच, “मग मी त्या दिवशी खरी भुतं पाहिली आणि त्यांचे आवाज ऐकले का हो डॉक्टर? कारण मित्र मला चिडवत होते. ‘अगर किसी भी चीज को सच्चे दिल से चाहो। तो सारी कायनात उसे तुंम्हे मिलाने मे जुट जाती है।’ आणि जोरजोरात हसतात पार इज्जतीचा पचका केलाय त्यांनी. आणि आता भुतं नसतात हे तरी कसे सांगणार मी.”
हे समजावून सांगणे गरजेचेच होते कारण, भुतं आणि अमावस्येला मानसिक आजार होणे किंवा वाढणे या दोन अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होणार होती. मग सगळ्यांना आत बोलावले आणि समजावून सांगितले.
“जेव्हा एखादी व्यक्ती रोज दारू पिण्यास चालू करते, तेव्हा त्या व्यक्तीला व्यसनाचा आजार होतो. दारू ही मेंदूवरती काम करते आणि त्याच्या कार्यपद्धतीत बदल करते, यावर तोडगा म्हणून आपला मेंदूही काही रसायनांची निर्मिती वाढवतो. जेव्हा रोज दारू पिली जाते तेव्हा हा दारुतील आणि मेंदूतील रसायनांचा नवीन बॅलन्स तयार होतो. त्यामुळे जर एखाद्यावेळेस दारू नाही पिली की झोप न येणे, धडधड होणे, चीडचीड होणे, हातपाय थरथर कापणे अशी लक्षणे येतात.” गणेश माझ्याकडे पाहून म्हणाला, “मलाही असेच होते.” राहूल ची आई त्याच्याकडे पाहून, “तरीच ! ‘उंदराला मांजर साक्ष’, म्हणूनच याने इतके दिवस सांगितले नाही आम्हांला. चल आता तुझी पण ट्रीटमेंट करून घे.”
“तल्लफ येणे, दारूचे प्रमाण वाढत जाणे, नाही घेतली तरी त्रास होणे, कंट्रोल करता न येणे, शरीराचे नुकसान होणे आणि आनंद दुःख काहीही झाले तरी फक्त दारू आठवणे अशी दारूच्या आजाराची लक्षणे मी त्यांना समजावून सांगितली. राहुल च्या बाबतीत त्याचे दारूचे प्रमाण जास्त होते आणि पाहुण्यांमुळे त्याचे पिणे अचानक बंद झाले त्यामुळे त्याला थोडा गुंतागुंतीचा आजार झाला. याला आम्ही डेलीरियम म्हणतो. हा आजार शेवटची दारू पिल्यानंतर 72 तासांनी म्हणजे तिसऱ्या दिवशी होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आणि आपल्या राहूलच्या बाबतीत असेच झाले.” ©Muktesh
“या डेलीरियम मध्ये, जो की संध्याकाळी जास्त होतो, चित्रविचित्र आकृती दिसणे, भास होणे, भीती वाटणे, हातपाय थरथर कापणे, रक्तदाब वरखाली होणे, उलटी होणे, झोप न येणे, जास्त प्रमाणातील गोंधळ यात आपण कुठे आहोत, काय करत आहोत यात गोंधळ होतो, घरातील माणसे ओळखू येत नाहीत.” पण मला हे सगळे नाही आठवत फक्त धूसर आठवते.” राहूल नेमधेच शंका विचारली. “हो असेच होते कारण या आजारात नवीन आठवणी तयार करण्याची मेंदूची शक्ती नाहीशी होते.” “पण मला भूतांचे आवाज आठवतात हो डॉक्टर.” तो काय भुतांना सोडतच नव्हता. सगळे देखील त्याच्याकडे।हसून पाहत होते. “या आजारातील काही गोष्टी आठवतात की, पण म्हणून भुत आहे असे थोडीच आहे. तुझ्याच मेंदूने तयार केलेला भूलभुलैय्या आहे तो. कारण खरे असते तर आम्ही सगळे होतोच की तिथे, आम्हांला नाही दिसले हं भूत.” मी पण मग भुतावर जोर दिला. राहुलचा चेहरा उजळला गणेशकडे पाहून “”येस्स ! आता तर आणखी एक शास्त्रीय कारण मिळाले मला, भुतांच्या अंधश्रद्धा दूर करण्यामध्ये. आणि असेच माझ्यासारखे, कधीतरी कोणाबरोबर तरी अमावास्येला हे झाले असेल, आणि आपल्या लोकांनी लगेच अमावस्येला बदनाम करून टाकली.”
“असा शास्त्रीय दृष्टिकोन आजकाल दुर्मिळ होत चाललाय. खूप लोकांनी सांगितले की आपण त्याची चिकित्सा न करता त्या गोष्टी खऱ्या मानतो. आणि फक्त येथेच थांबत नाही तर बाकीच्यांना आणि अगदी आपल्या लहानमुलांना तेलमीठ लावून सांगतो. अंधश्रद्धा अश्याच तयार होतात आणि वाढत जातात. आणि रंगवल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे टिकून राहतात, वर्षानुवर्षे.” ©Muktesh
राहूल, गणेश आणि त्याचे कुटुंबीय या नवीन मिळालेल्या माहितीचा नक्कीच वापर करतील तुम्हीसुद्धा करा.
“अगर किसी भी चीज को सच्चे दिल से चाहो। तो सारी कायनात उसे तुंम्हे मिलाने मे जुट जाती है।” आणि मानसिक आजार आणि चंद्राच्या अवस्था यांच्याविषयी सविस्तर नंतर कधीतरी……
#मुकाम्हणे
#Psychiatrist
Written by
डॉ. मुक्तेश दौंड
MBBS DNB Psychiatry
मनोविकारतज्ञ
निम्स हॉस्पिटल, नाशिक