चूक कोणाची ?

चूक कोणाची ?

साधना (अर्थातच नाव बदलले आहे) एक 38 वर्षांची लग्न झालेली पण तिकडील वागणुकीला वैतागुन माहेरी आलेली. माहेरी येताना झालेली तिची फरफट आणि नंतर येथे सामावून घेताना आलेल्या अडचणींमुळे ती नैराश्याच्या गर्तेत ढकलली गेली. अगदी आत्महत्येचे नियोजन करू लागली आणि त्या दरम्यान आमची भेट झालेली. खरंतर तिच्या मनाविरुद्ध तिचा भाऊ तिला घेऊन आलेला. कारण बाकीच्यांसारखे तिचेही हेच मत होते की, मनोविकारतज्ञ (Psychiatrist) म्हणजे वेड्यांचे डॉक्टर, मला नाही भेटायचे त्यांना आणि मी वेडी नाहीये.

सुरुवातीच्या दोन तीन भेटींमध्ये, तिच्या घरची आणि तिच्या मनातली घालमेल हळू हळू उलगडत गेली. आणि माझ्या औषधांनी तिला गुण आला हे तीने मान्य सुद्धा केले. “बरे झाले मी त्या दिवशी आले, नाहीतर आज काय झाले असते, याची मी कल्पनाच करू शकत नाही. हो डिप्रेशन हा आजार आहे ! आणि तो योग्य औषधांनी बरा होतो, हे मला कळले आहे डॉक्टर.” असेही तिने एकदा दोनदा बोलून दाखवले. त्याचवेळेस तिला स्पष्ट सांगितलेलं, औषधांनी तुझा आजार कमी केला आहे पण तुझी परिस्थिती तुलाच बदलायची आहे, तिथे औषधे आणि आम्ही डॉक्टर काहीच कामाचे नाही. अचानक जुलै महिन्यानंतर तिने येणे बंद केले.

आणि काल अचानक अपॉइंटमेंट न घेता ती क्लिनिकला आली. बरोबर 12 वी ला शिकणारी मुलगी होती. ह्यावेळी मुलीने बोलायला सुरुवात केली. “सर, ही परत पहिल्यासारखे करायला लागली. एकटी राहते, झोपत नाही, रडत असते. जेवत नाही की मिसळत नाही. मागच्या एक महिन्यापासून परत हा त्रास जास्तच होतोय.

तिनेच मुलीला शांत केले, आणि म्हणाली मला बोलू दे. “सर घटस्फोटाची केस कोर्टात उभी राहिली आहे. भरपूर खर्च होतोय, त्यात आता भाऊ पैसे द्यायला का कू करतोय. मला काम करू देत नाहीयेत. घरात जो तो कुठल्याही गोष्टींसाठी मला जिम्मेदार पकडतोय. तिकडून येताना जो पाठिंबा आणि आत्मविश्वास दिला होता तो सगळा संपून गेलाय. कोणीच मला समजून घेत नाहीये, खूप एकटे एकटे वाटत आहे. कुठे बोलायची सोय नाही की बाहेर जायला मुभा नाही. माझ्या जगण्यावरच प्रश्न आहेत ? काय करू मी ? मुलींकडे पाहून जगते.”

“येताना माझ्या मनात विचार होतेच, आपल्याकडे लग्न लावून दिले म्हणजे माहेरची मंडळी हात उचलून घेतात. त्यानंतर चांगले झाले तर आम्ही चांगले स्थळ शोधून दिले याचा सगळीकडे गवगवा करतात, आणि नाही जमले तर असतेच ‘मुलगी’ हक्काची चूक करणारी व्यक्ती. सगळे दोष आणि जबाबदाऱ्या तिच्यावर टाकून मोकळे होणारे. त्यावेळेस हे विचार होतेच पण तिकडचे अगदीच सहनशक्तीच्या पलीकडचे होते, आणि यांनी खूपच आश्वासक वातावरण तयार केले होते. जे की आता काहीच नाहीये. यामुळे मी औषधे बंद केली आणि तुम्हांला भेटायला पण नाही आली. कशाला आणखी खर्च माझ्या उद्देशहीन आयुष्यावर.” असे खूप काही ती बोलून गेली, आणि मोकळी होत गेली शेवटी शेवटी अश्रू थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न तिने केला नाही. “सर म्हणून मला आता परत सगळा त्रास होतोय, काय करू मी ?”

अशी भावनिक वादळे आम्ही सायकीयाट्रिस्ट रोज अनुभवतो, पण आम्ही जज थोडीच आहोत निर्णय घ्यायला, की कोण बरोबर आणि कोण चुकीचे ? पण असे प्रश्न एकट्याने असल्यावर पडतात खूप वेळा. आणि खूप विचार करूनही त्याची उत्तरे नाही मिळत. मग मी पण लिहिन्यातून व्यक्त व्हायचे ठरवले आणि तेच करतोय.

डॉक्टरकीच्या (सायकीयाट्रिस्टच्या) चष्म्यातून पाहिले तर तिला येणारे डिप्रेशन फक्त तिच्या आजूबाजूच्या गोष्टींमुळे झाले असे मी म्हणणार नाही, ती आनुवंशिक दृष्ट्या (जनुकीय) सुद्धा जास्त व्हलनरेबल होती. ही गोष्ट लोकांनी समजणे खूप गरजेचे आहे, कारण सरसकट काहीही झाले की हिने टेन्शन घेतले म्हणूनच असे झाले, असे बोलणारे महारथी आपल्याकडे आहेत. जास्त आणि नकारात्मक विचार येणे हे ‘आजाराचे लक्षण आहे कारण नाही’ हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे असा त्रास असणाऱ्यांना, “दे रे सोडून” हा फुकटचा सल्ला देणे बंद करा. कारण त्यांना जर सोडता आले असते तर हा त्रास झालाच नसता आणि या अवस्थेला आजाराची मान्यता मिळालीच नसती.

दुसरे सगळ्यात महत्वाचे, तिने जे काही सांगितले ते नैराश्याच्या आजारात सांगितले आहे हे विसरून चालणार नाही. तिच्या घरच्यांशी चर्चा करणे तेव्हढेच महत्वाचे आहे. कारण जो भाऊ सुरुवातीला हक्काने माझ्याकडे घेऊन आलेला, तो लगेच एव्हढे तिला त्रास देईल असे मला वाटत नव्हते. नैराश्याच्या आजारांमध्ये वाईट गोष्टी मोठ्या करून सांगितल्या जातात आणि चांगल्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात. त्यामुळे फक्त तिच्या बोलण्यावरून मी तिच्या घरच्यांविषयी कुठलेही मत बनवणार नव्हतो. पण त्यांचे एक नक्की चुकले, ते म्हणजे ट्रीटमेंट विषयी सगळी माहिती देऊन सुद्धा, हिने ट्रीटमेंट बंद केली आहे हे त्यांच्या लक्षात नाही आले.

पण अशा केसेस म्हणजे आपल्या समाजाच्या आरसा असतात, यात काहीच शंका नाही. त्या आपल्या सध्याच्या समाजाचे छान प्रतिनिधित्व करतात, कुठलाही आड पडदा न ठेवता, वरून छान छान वाटणाऱ्या आपल्या स्वार्थी आयुष्याचे खाजगीतील भयानक वास्तव दाखवतात. मनोविकारतज्ञ (Psychiatrist) म्हणून मी तिला डिप्रेशन मधून परत बाहेर काढेल, यात शंकाच नाही. पण अशा खचलेल्या मनाने आयुष्याची चांगल्या चांगल्याना न सुटलेली गणिते तिला सुटतील का? हा प्रश्न आहेच.

डॉ. मुक्तेश दौंड
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल,
गंगापूर रोड,
नाशिक.