नात्यांतील सीमोल्लंघन
नाती, कितीतरी प्रकारची, कितीतरी तऱ्हेची. आयुष्य सुरू करणारी, फुलवणारी, रंगवणारी, उद्धस्त करणारी आणि उध्वस्तपणातून परत सावरणारी सुद्धा. आयुष्याला खरा अर्थ येतो तो अश्या चांगल्या जोपासलेल्या, सांभाळलेल्या आणि खुलवलेल्या नात्यांनी.
पण आज आजूबाजूला पाहिल्यावर काय दिसते. तर आपण ! आपल्या बऱ्याच हसत्या खेळत्या नात्यांना प्रोफेशनल या गोंडस नावाखाली कोंडून ठेवले आहे किंवा त्याला तसा मुलामा तरी दिला आहे. छान हसणारे आणि सांभाळून घेणारे ते नाते, प्रोफेशनल कधी झाले आणि त्याला व्यवहाराचे नियम कधी लागले. त्यात नको असलेला पोक्तपणा कधी शिरला हे खरंच आपल्या लक्षातच येत नाही. मग हीच गोष्ट अशीच पुढे सुरू राहते आणि त्या नात्यांसाठी मनातल्या मनात आपण सीमा रेषा ठरवायला लागतो.
मग या बदललेल्या दृष्टिकोनामुळे, काळानुसार किंवा आलेल्या अनुभवांमुळे म्हणा, पण या सीमा रेषा आणखी गडद होत जातात. आणि आपले ते आवडीचे नाते संभाळण्यामध्ये आणि फुलवण्यामध्ये खूप मोठा अडसर ठरू लागतात. अशी वेळ आल्यावर, आपणच नात्यामध्ये ठरवलेल्या त्या सीमा, आपल्यालाच कैद करून टाकत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण त्या आखून घेतलेल्या चौकटीत राहूनच त्या नात्याचा विचार करतो. आणि मग त्या नात्याला सुरुंग लागायला सुरुवात होते. आणि एक हसरे खेळते नाते एका भळभळत्या जखमेमध्ये बदलून जाते. असे कितीतरी आधुनिक अश्वत्थामा ज्याच्या त्याच्या भळभळत्या जखमा घेऊन फिरत असतात. त्रास सहन करत, जगापासून लपवायचा प्रयत्न करत, पण स्वतः पासून कश्या लपवणार ना ?
जर आपली नाती टिकवायची, जोपासायची आणि वाढवायची असतील तर आपल्या मनातील या सीमा रेषा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला हे कळतही असते, पण मीच का? मला काय गरज आहे ? पाहू नंतर ? किंवा असली काहीतरी कारणे देऊन आपण स्वतः ला फसवत राहतो. त्या दुरावत चाललेल्या नात्याविषयी काहीच निर्णय न घेणे हा पण एक निर्णयच असतो, हे आपण कुठेतरी विसरतो आणि त्याची खूप मोठी किंमत नंतर चुकावतो. लक्षात ठेवा “Each choice has it’s own Price.” ज्या त्या नात्याची किंमत (Value) ज्याने त्याने ठरवावी आणि जर टिकवायचे असेल तर पुढाकार (कमीपणा) घ्यायला काहीच हरकत नाही.
जर असे तुमचे एखादे, हसते खेळते नाते दुरावत चालले असेल तर आज या विजयादशमीच्या मुहूर्तावर मनातील आपणच घातलेल्या सीमारेषांचे सीमोल्लंघन तुम्ही करावे अश्या तुम्हांला मनापासून शुभेच्छा. कारण…………
कारण सांगणे न लागे, आपण सुज्ञ आहातच.
#मुकाम्हणे
डॉ. मुक्तेश दौंड,
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड,
नाशिक.